भारतीय इतिहासकाराने हवामान बदलाचा दोष इतर देशांना देऊन लादले जात असलेल्या निर्बंधांवर केली सडकून टीका


नवी दिल्ली – हवामान बदल आणि त्याचा जगावर सध्या होणारा परिणाम हा चिंतेचा विषय आहे. जागतिक हवामान बदल परिषदही त्यासाठी घेण्यात आली. जगभरातील देशांच्या प्रमुखांनी यात हजेरी लावत आपल्या भूमिका व्यक्त केल्या. त्यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या देशांची भूमिका महत्त्वाची दिसत आहे. पण, आता हवामान बदलाचा दोष इतर देशांना देऊन लादले जात असलेल्या निर्बंधांवर भारतीय इतिहासकार विजय प्रसाद यांनी सडकून टीका केली आहे. तसेच अमेरिका-ब्रिटनची अक्षरशः शाळा घेतली.

विजय प्रसाद म्हणाले, ब्रिटनमधील ग्लास्गो हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर होते. यात खूप सुंदर इमारती, चांगले रस्ते आणि अनेक सुविधा आहेत. पण, जेव्हा मी अशी शहरे पाहतो, तेव्हा मला याची दुसरी बाजू दिसते. एक म्हण आहे प्रत्येक नागरी वसाहतीचे स्मारक हे त्या समाजातील क्रुरतेचेही स्मारक असते. ज्युट कामगार बंगालमध्ये दांडीमार्गे ग्लास्गो बंदरावर माल पाठवायचे. आफ्रिकेतील नागरिकांना गुलाम करून घाणातून पाश्चिमात्य देशांमध्ये आणण्यात आले. त्यांच्या कष्टातून सर्व नफ्याचे शोषण करून लंडन आणि ग्लास्गोसारख्या शहरात ओतला जायचा.

१७६५-१९३८ या काळात ब्रिटिशांनी भारताकडून ४५ ट्रिलियन पाऊंड लुटले. आम्हाला त्यासाठी कधीही मोबदला देण्यात आला नाही. जेव्हा भारत ब्रिटिशांनी सोडला देशाचा शिक्षणाचा दर १३ टक्के होता. या काळात आमच्या जमिनी उद्ध्वस्त करण्यात आल्या. भारतावर ब्रिटिशांनी कोळसा लादला. ब्रिटिशांनीच भारताला कोळशावर परावलंबी केले आणि आता तेच आम्हाला प्रश्न विचारत दोष देत असल्याचे विजय प्रसाद यांनी सांगितले.

प्रसाद पुढे म्हणाले, जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान बॉरिस जॉन्सन, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना मी ऐकतो, तेव्हा त्यांनी कसे उपकार केले हेच ऐकू येते. यांनी ४०० वर्षांपासून आजपर्यंत उपकार केले असेच सांगत आहे. केवळ भूतकाळात वसाहतवाद हा झाला असे नाही. त्यांच्यासाठी वसाहतवाद ही कायमची अट आहे. वसाहतवादी मानसिकतेतून ही अट पूर्ण होते.

आम्हाला या देशांना उपदेश करायचे आहेत. आम्ही सर्व प्रश्नांना कारणीभूत आहोत हे त्यांना सांगायचे आहे. कारण या सर्वांचा दोष त्यांचाच आहे, हे त्यांनी कधी मान्यच केले नाही. यांनी १९९२ मध्ये रिओ धोरण स्विकारले. त्यात त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आणि काही जबाबदाऱ्या सामूहिकपणे ठरवण्यात आल्या. पण त्यांना केवळ सामूहिक जबाबदाऱ्या आवडतात. ते सांगतात आपण सोबत आहोत, पण सर्वजण सोबत नसल्याचेही विजय प्रसाद यांनी नमूद केले.

विजय प्रसाद म्हणाले, आजही अमेरिकेची ४-५ टक्के लोकसंख्या जगातील २५ टक्के संसाधनांचा वापर करते. त्यांनी चीनमध्ये उत्पादन हलवले. त्यानंतर सांगतात की चीन कार्बन उत्सर्जनाला कारणीभूत आहे. अमेरिकेच्या बादल्या, नट-बोल्ट्स, फोन चीन उत्पादित करत आहे. हे सर्व उत्पादन तुम्ही स्वतःच्या देशात करावे आणि मग बघावे किती कार्बन उत्सर्जन होते. आम्हाला यांना उपदेश द्यायला आवडते. कारण यांची मानसिकता वसाहतवादाची आहे.

वसाहतवाद अमेरिकेच्या व्यवस्थेतच आहे. हे आम्हाला प्रत्येकवेळी कर्ज देतात. खरतर ते आमचेच पैसे आहेत. दरवेळी जागतिक नाणेनिधी (IMF) आम्हाला निधी देतात आणि ते पैसे देत असल्याचे सांगतात. पण नाही, ते आमचेच पैसे आहेत. तुम्ही परतावा म्हणून आमचे पैसे आम्हाला देत आहात. असे असतानाही ते आम्ही कसे राहावे असे उपदेश देतात. ही केवळ वसाहतवादी मानसिकता नाही, तर वसाहतवादी संस्था आहेत, ज्या वर्षानुवर्षे वसाहतवाद निर्माण करत असल्याचा आरोप प्रसाद यांनी केला.

विजय प्रसाद म्हणाले, या वसाहतवादाच्या मुद्द्यावर जागतिक हवामान बदल चळवळ पुरेशी नाही. आम्हाला ही चळवळ भविष्याची काळजी असल्याचे म्हणत आहे. मात्र, कोणते भविष्य? अफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिकामधील मुलांना अजिबात भविष्य नाही. या मुलांना वर्तमानकाळच नसल्यामुळे त्यांना भविष्याची काळजी नाही. भविष्याची काळजी आहे ही पाश्चिमात्य मध्यमवर्गीय घोषणा आहे. तुम्हाला आत्ताची काळजी वाटली पाहिजे.

जगातील २७० कोटी लोकांना खायला अन्न मिळत नाही आणि तुम्ही लोकांना सांगता वापर कमी करा. अनेक दिवसांपासून ज्या मुलाने जेवण केले नाही, त्याला हे सांगणे कसे वाटेल? अन्यथा या चळवळीला तिसऱ्या जगात काहीही भविष्य नसेल. जगात २०० राजकीय पक्षांची संघटना आहे. जगाच्या दक्षिणेत या संघटनेचे काम चालते. आम्हाला तुम्हाला आमचे प्रश्न काय आहेत हे सांगायचे आहे. पण तुम्हाला ते ऐकायचे आहे का? असा सवाल प्रसाद यांनी केला.