जशास तसे उत्तर देण्याचा विचार आम्ही केला याचा मला पश्चात्ताप आहे – देवेंद्र फडणवीस


मुंबई – पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत शपथ घेण्याच्या निर्णयावरुन राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पश्चात्ताप व्यक्त केला आहे. मुंबई तकला महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर फडणवीसांनी यावेळी जोरदार टीका केली.

फडणवीसांनी म्हटले की, शिवसेनेने विश्वासघात केल्यानंतर जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही अजित पवारांसोबत मिळून सरकार स्थापन केले होते. कारण आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला होता. तसेच पुढे बोलताना त्यांनी, जशास तसे उत्तर देण्याचा विचार आम्ही केला याचा मला पश्चात्ताप आहे. हे नसते झाले, तर चांगले झाले असते, असेही सारखे वाटते. मला माहिती आहे, त्यावेळी काय झाले होते आणि कोणी काय केले होते, असे सांगितले. फडणवीसांनी आपण एक पुस्तक लिहिणार असून त्यामध्ये या सर्व घटना उघड करणार असल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी राज्यात फक्त सरकार असून प्रशासन नसल्याची टीका केली.

महाराष्ट्रात कोरोना स्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात आली नसल्याची टीका यावेळी फडणवीसांनी केली. ते म्हणाले की, १० हजार मृत्यू राज्य सरकारने लपवले. सरकारने कोरोना स्थिती योग्य प्रकारे हाताळल्याचे सांगत आपली पाठ थोटपली, पण देशातील एकूण मृत्यूंपैकी ३५ टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाल्याचे सत्य ते स्वीकार का करत नाहीत? राज्य सरकार कोसळणार असल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले की, सरकार जेवढे स्थिर दिसते, तेवढेच ते कोसळण्याची शक्यता अधिक असते. हे सरकार आपल्याच वजनाने खाली येईल असा पुनरुच्चार यावेळी त्यांनी केला.