दारुबंदी असणाऱ्या बिहारमध्ये विधानसभा परिसरात सापडल्या दारुच्या बाटल्या; तेजस्वी यादव म्हणाले


पाटना – दारुबंदी असणाऱ्या बिहारच्या विधानसभा परिसरात दारुच्या बाटल्या सापडल्यामुळे गदारोळ झाला आहे. बिहार विधानसभा परिसरात दारुच्या मोकळ्या बाटल्या आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरुन राजकारण रंगले असून माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे आमदार तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दारुच्या बाटल्या सापडल्याने मुख्यमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.

दारुच्या मोकळ्या बाटल्या विधानसभा परिसरात मिळाल्याची माहिती मिळताच तेजस्वी यादव घटनास्थळी पोहोचले होते. ट्विटरवर तेजस्वी यादव यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हे आश्चर्यकारक असून मुख्यमंत्र्यांच्या चेंबरपासून काही पावलांच्या अंतरावर वेगवेगळ्या ब्रॅण्डची दारु उपलब्ध असल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

एवढ्या कडक सुरक्षेत सुरु असलेल्या अधिवेशनादरम्यानही विधानसभेत दारु मिळत असेल, तर उर्वरित बिहारची फक्त कल्पना करा, असे म्हणत तेजस्वी यादव यांनी हे लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते असणाऱ्या तेजस्वी यादव यांनी या घटनेचा निषेध करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून संपूर्ण राज्यात पूर्णपणे दारुबंदी लागू करावे, असे म्हटले आहे. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. राज्यभरात दारुच्या बाटल्या सापडत आहेत. दारुवर पूर्ण बंदी असली पाहिजे, असे तेजस्वी यादव म्हणाले आहेत.

हे गंभीर प्रकरण असल्याचे नितीश कुमार यांनी देखील मान्य करताना याची चौकशी केली जाईल, अशी माहिती दिली. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. याचा तपास होणे गरजेचे आहे. जर अध्यक्षांनी परवानगी दिली, तर आम्ही मुख्य सचिव आणि डीजीपींना याचा तपास करायला सांगू शकतो, असे नितीश कुमार म्हणाले आहेत.

आज बिहार विधानसभा हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पण कामकाज सुरु होण्याआधीच दारुबंदीवरुन राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई वीरेंद्र आणि भाजप आमदार संजय सरावगी यांच्यात वाद झाला. प्रकऱण एवढे वाढले की राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराने भाजप आमदाराला शिव्या देण्यास सुरुवात केली.