अँटिलिया प्रकरणी अजून एक धक्कादायक माहिती बाहेर येणार, नवाब मलिक यांचा सूचक इशारा!


पुणे – सचिन वाझे यांच्यासोबत मुंबई पोलिसांमधील इतरही काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सध्या अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी चौकशी सुरू आहे. न्यायालयात हे प्रकरण असताना आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सूचक इशारा दिला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि सचिन वाझेंच्या चौकशीसंदर्भात अजून एक धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचा दावा केला आहे.

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. अँटिलियाबाहेर स्फोटके ठेवण्याचे कारस्थान परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी मिळून रचल्याचे ते म्हणाले. हे सर्व प्रकार राजकीय हेतूने झाले. अँटिलियाच्या बाहेर बॉम्ब ठेवण्याचे कारस्थान परमबीर सिंह आणि वाझेंनी मिळून रचले होते. त्या दोघांनी सरकारला चुकीची माहिती दिली. हत्या केल्यानंतर देखील ते चुकीची माहिती देत होते. परमबीर सिंह यांची होमगार्डला बदली केल्यानंतर त्यांनी इमेलवर तक्रार केली. हा सगळा विषय राजकीय हेतूने प्रेरित होता. चांदीवाल आयोगाचा अहवाल आल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल, असे नवाब मलिक म्हणाले.

एक बनावट पाकिस्तानी पासपोर्ट सचिन वाझेंनी बनवल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. आज ना उद्या आणखीन एक धक्कादायक माहिती समोर येणार आहे. अँटिलिया प्रकरणात एका क्षुल्लक गुंडाच्या नावाने बनावट पासपोर्ट बनवण्यात आला होता. त्यावर पाकिस्तानचा एक्झिट-एंटर दाखवला गेला होता. तो वाझे आणि परमबीर सिंह यांनी तयार केला होता. मनसुख हिरेन शरण येण्यासाठी तयार झाला असता, तर त्याचा फेक एन्काउंटर करण्याचा प्लान परमबीर सिंह आणि वाझेचा होता. वाझेच्या घरून एनआयएला तो फेक पासपोर्ट मिळालेला आहे. एनआयएने ही माहिती उघड करावी, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, नवाब मलिक भविष्यात ईडीबाबत देखील मोठा धमाका करणार असल्याचे म्हणाले. आमचा ईडीच्या बाबतीत शोध सुरू आहे. भविष्यात त्याबाबत मोठा धमाका होणार आहे. केंद्र सरकार म्हणेल तसे विभाग चालतो आहे. राणेंना आलेल्या ईडीच्या नोटिशीचे काय झालेस, हे कुणाला माहितीच नाही. राणे ईडीच्या माध्यमातून भाजपमध्ये गेले. ईडीच्या माध्यमातून गुजरातमधील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस सोडली. बंगालमध्ये टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा घरवापसी झाली. ईडीच्या यंत्रणेचा गैरवापर होतच असल्याचे नवाब मलिक म्हणाले.