म्हणून राहुल द्रविडने मैदान कर्मचाऱ्यांना दिले ३५ हजाराचे बक्षीस

टीम इंडियाचा नवा हेड कोच राहुल द्रविड याने शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील कर्मचाऱ्यांनी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडीयम मधील मैदान किंवा पीच उत्तम प्रकारे तयार केल्याबद्दल स्वतःच्या खिशातून ३५ हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे. या मागचे कारण कळल्यावर राहुल द्रविडचे चाहते त्याच्यावर भयंकर खुश झाले आहेत.

प्रथम पासूनच राहुल द्रविड निष्पक्ष खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. कानपूर येथे न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामना काल अनिर्णीत राहिला होता. भारतीय वंशाचे एजाज पटेल आणि रचीन रवींद्र यांनी न्यूझीलंड टीम कडून खेळताना संयमपूर्ण खेळ केला आणि शेवटची विकेट राखली त्यामुळे सामना अनिर्णीत राहिला. उत्तरप्रदेश क्रिकेट असोसिएशनने खेळानंतर प्रेस बॉक्स मध्ये राहुल द्रविडने ग्राउंडसमन साठी स्वतः ३५ हजार रुपये प्रोत्साहन बक्षीस म्हणून दिल्याचे जाहीर केले.

आजकाल विदेशी टीम मैदान तयार करून घेताना त्यांना सोयीचे असेल त्याप्रमाणे मैदान तयार करतात आणि यामुळे अनेकदा तीन दिवसात सामना संपतो. कानपूरचे पीच तयार करताना मात्र गोलंदाज आणि फलंदाज अश्या दोघानाही न्याय देऊ शकेल यावर लक्ष दिले गेले. त्यामुळे सुरवातीला वेगवान गोलंदाजांनी फलंदाजांना हैराण केले तसेच फलंदाजांनी सुद्धा चांगल्या रन्स काढल्या. हे पीच स्पिनर्स, वेगवान गोलंदाज आणि फलंदाज सर्वाना साथ देणारे म्हणजे स्पोर्टिंग पीच ठरले. त्यात दोन्ही बाजूंचे संतुलन दिसून आले. या पीच मुळे सामना पाच दिवस खेळला गेला आणि वेगवान गोलंदाजांनी १६ तर स्पिनर्सनि २० विकेट मिळविल्या. दोन्ही टीमना या मैदानावर जिंकण्याची समान संधी मिळाली यामुळे राहुल द्रविड समाधानी होता आणि यापुढेही अशीच पीच तयार केली जावीत यासाठी प्रोत्साहन म्हणून त्याने कर्मचार्यांना बक्षीस दिले असे समजते.