रोबोसाठी चेहरा द्या आणि झटक्यात दीड कोटींची कमाई करा

एका झटक्यात करोडपती बनण्याचे स्वप्न जे कुणी पाहत असतील त्यांच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध रोबो उत्पादन कंपनीने तुमच्या चेहऱ्याचा वापर करून दिलात तर दीड कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. जसा करार होईल त्या क्षणी ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे.

डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार न्यूयॉर्क येथील रोबो कंपनी ‘प्रोमोबॉट’ ने नवा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्यानुसार २०२३ पासून माणसाचा चेहरा असलेले रोबो काम करू लागतील. अर्थात त्यासाठी माणसाचा चेहरा हवा. हे रोबो नंतर हॉटेल, शॉपिंग मॉल्स, विमानतळावर तैनात केले जाणार आहेत. गेली दोन वर्षे माणसाचा चेहरा असलेला रोबो तयार करून त्याची विक्री होत आहे. याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि वाढती मागणी लक्षात घेऊन खऱ्या माणसाचा चेहरा रोबोला देण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला गेला आहे. अर्थात संबंधित माणसाची अधिकृत परवानगी त्यासाठी घेतली जाणार आहे.

या नव्या प्रोजेक्ट नुसार जो त्याच्या चेहऱ्याचा वापर रोबोसाठी करण्यास परवानगी देईल त्याला दीड कोटींचे इनाम दिले जाणार आहे. महिला पुरुष दोघेही यासाठी पात्र आहेत. वयाची अट नाही. जे चेहरे येतील त्यांची स्क्रुटिनी केली जाणार असून ज्याची निवड होईल त्याच्याबरोबर करार केला जाणार आहे. हा चेहरा दयाळू, फ्रेंडली असावा अशी अपेक्षा आहे.

मानवाशी साम्य असलेल्या चेहऱ्यांच्या रोबोंचा वापर उत्तर अमेरिका व मध्य पूर्व देशात होतो असून सध्या या कंपनीचे रोबो ४३ देशात आहेत. एका रिपोर्ट नुसार २०१७ मध्ये हॉंगकॉंग येथील हॅनसन रोबोट फर्मने सोफिया नावाची रोबो तयार केली असून माणसाप्रमाणे डोळे मिचकावणे, कडेने पाहणे, बोलणे अशी कामे करू शकते. सौदी अरेबियाने सोफियाला नागरिकत्व प्रदान केले असून एखाद्या देशाचे नागरिकत्व मिळविणारा सोफिया हा पहिला रोबो आहे.