अधिवेशन काळात संसद कॅन्टीनमध्ये अशी असते तयारी
२९ नोव्हेंबर पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात या काळात वातावरण तापलेले असते त्याचप्रमाणे खासदार, मंत्री आणि त्यांचे स्टाफ यांची भूक भागविणाऱ्या ऐतिहासिक कॅन्टीन मध्येही गरमागरम पदार्थांमुळे वातावरण चांगल्या अर्थाने तापलेले असते. हे कॅन्टीन वर्षाचे बारा महिने सुरु असले तरी अधिवेशन काळात येथील वर्दळ प्रचंड वाढते आणि येणाऱ्या सर्व भुकेल्या लोकांना वेळेवर खाद्य पदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी येथे अनेक प्रकारे तयारी सुरु असते. काय आहे या कॅन्टीनचा इतिहास आणि कशी केली जाते इथली तयारी हे जाणून घेणे मनोरंजक आहे.
या ठिकाणी चहा, कॉफी बरोबरच नाश्ता, जेवण आणि उपहाराचे पदार्थ तयार होत असतात. आजपर्यंत येथे अनुदान किंवा सबसिडी पद्दत होती त्यामुळे अतिशय कमी पैशात दर्जेदार पदार्थ दिले जात. पण मोदी सरकारने कॅन्टीनची सबसिडी संपविली त्यामुळे आता पूर्वीच्या दरात येथे पदार्थ मिळत नाहीत. खासदार, मंत्री, त्यांचे सहाय्यक शिवाय अधिवेशन कव्हर करायला आलेले पत्रकार यांची या काळात येथे एकाच गर्दी असते. या कॅन्टीनला त्याचा असा खास इतिहास आहे.
देशाला स्वातंत्र मिळाल्यावर खासदार, संसद कर्मचारी, येणारी जाणारी तमाम प्रतिनिधी मंडळे, पाहुणे यांच्या क्षुधा शांतीसाठी कॅन्टीन सुरु झाले ते अगदी छोट्या स्वरुपात. पूर्वी लोकसभेचा स्टाफ हे कॅन्टीन चालवत असे. पहिले पंतप्रधान नेहरू अनेकदा येथे येत असत. ६० च्या दशकात कॅन्टीनमध्ये आमुलाग्र बदल झाला. पूर्वीच्या स्टोव्हच्या जागी एलपीजीचा वापर सुरु झाला आणि त्याकाळी कॅन्टीनची जबाबदारी रेल्वेच्या आयआरसीटीसी कडे होती. अतिशय कमी दरात शाकाहारी, मांसाहारी पदार्थ येथे पुरविले जात असत. कॅन्टीनचा एक मुख्य मुदपाकखाना आहे. तेथे पदार्थ तयार केले जातात आणि पाच कॅन्टीन मध्ये नेले जातात. त्यासाठी पहाटेपासून तयारी सुरु असते.
२००८ मध्ये पाईप गॅस लिक होण्याचे काही प्रकार आणि अन्न शिजविण्याची उपकरणे वारंवार खराब होण्याचे प्रकार घडल्यावर येथील पूर्ण सिस्टीम बदलली गेली. आता येथे पूर्णपणे किचन साठी विजेचा वापर होतो. बनत असलेल्या पदार्थांची गुणवत्ता आणि व्यवस्थापन यासाठी खासदारांची एक समिती नेमली जाते. रेल्वेच्या ताब्यात या कॅन्टीनचे व्यवस्थापन होते तेव्हा येथे ४०० कर्मचारी स्टाफ होता आणि ५ हजार लोकांचे जेवण येथे अधिवेशन काळात तयार होत असे. सकाळी ११ वाजता पदार्थ तयार असत आणि ९० प्रकारचे पदार्थ दिले जात. मात्र २७ जानेवारी पासून बदल झाला असून आत्ता कॅन्टीनची जबाबदारी भारतीय पर्यटन विकास मंडळ पाहते. सध्या येथे ४८ प्रकारचे पदार्थ पुरविले जातात.
येथे आणल्या जाणाऱ्या सर्व कच्च्या मालाची चोख तपासणी केली जाते. मिठायांसाठी टेंडर काढली जातात. २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी येथेच जेवण घेत असत. त्यापूर्वी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी हेही येथे अधून मधून येत मात्र पंतप्रधानपदी असताना पीव्ही नरसिंह राव नियमित येथे येत असत. या कॅन्टीन मध्ये अनेक नामवंत शेफ आहेत आणि अशोक हॉटेलशी ते संबंधित आहेत असे समजते.