हिवाळी अधिवेशन: शिवसेनेच्या दोन खासदारांसह विरोधी पक्षातील १२ खासदारांचे निलंबन


नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अभूतपूर्व गोंधळावरुन संसदेचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत विरोधी पक्षाच्या १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.काँग्रेसचे पाच, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन खासदारांचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे.

ही कारवाई सभागृहामध्ये गैरवर्तवणूक करुन कामकाजामध्ये अडथळा आणल्याबद्दल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. काँग्रेसला कारवाईचा सर्वात मोठा फटका बसला आहे. निलंबित खासदारांमध्ये सर्वाधिक म्हणजेच अर्धे खासदार हे काँग्रसचे आहेत. त्याचप्रमाणे सीपीएम, तृणमूल आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन असे एकूण १२ खासदार निलंबित करण्यात आले आहेत.

या सर्व खासदारांनी राज्यसभेच्या २५४ व्या अधिवेशनामध्ये म्हणजेच ११ ऑगस्ट २०२१ च्या दिवशी झालेल्या मान्सून सत्राच्या वेळेस सभागृहाची प्रतिमा मलिन होईल अशी वर्तवणूक केल्यामुळेच राज्यसभेच्या सदस्यांच्या वर्तवणूकी संदर्भातील नियमांमधील नियम क्रमांक २५६ नुसार १२ खासदारांचे हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

या खासदारांचे झाले निलंबन
प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना)
अनिल देसाई (शिवसेना)
एल्लामारम करीम (सीपीएम)
बिनोय विश्मव (सीपीआय)
डोला सेन (तृणमूल काँग्रेस)
शांता छेत्री (तृणमूल काँग्रेस)
फुलो देव निताम (काँग्रेस)
छाया वर्मा (काँग्रेस)
रिपून बोरा (काँग्रेस)
राजमणी पटेल (काँग्रेस)
सय्यद नसीर हुसैन (काँग्रेस)
अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस)