WhatsAppच्या एंट्रीमुळे डिजिटल पेमेंट व्यवसायातील स्पर्धा होणार आणखी तगडी


मुंबई – एनपीसीआयने व्हॉट्सअॅपच्या पेमेंट सेवेअंतर्गत वापरकर्त्यांची मर्यादा वाढवण्याची परवानगी दिल्यामुळे डिजिटल पेमेंट व्यवसायातील स्पर्धा आणखी तगडी होणार आहे. तसेच व्हॉट्सअॅपवर आतापर्यंत 20 दशलक्ष वापरकर्त्यांची मर्यादा लागू करण्यात आली होती, ती आता 4 कोटींपर्यंत वाढवता येणार आहे. एनसीपीआयकडे आपल्या पेमेंट सेवेतील वापरकर्त्यांची मर्यादा वाढवण्यासाठी व्हॉट्सअॅपने अर्ज केला होता, जो आतापर्यंत पुनरावलोकनाखाली होता.

याबाबत सूत्रांच्या हवाल्यानुसार, देशाची रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चालवते. एनपीसीआयने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये व्हॉट्सअॅपला पेमेंट सेवा सुरू करण्यास मान्यता दिली होती. परंतु, त्याच वेळी त्यावर 20 दशलक्ष वापरकर्त्यांची मर्यादा घातली होती. म्हणजे व्हॉट्सअॅप आपली पेमेंट सेवा फक्त 20 दशलक्ष लोकांनाच देऊ शकत होती.

पेमेंट सेवेची मान्यता मेटाचा मालकी हक्क असलेल्या व्हॉट्सअॅपला मिळाल्यावर डिजिटल पेमेंटच्या विश्वात मोठी उलथापालथ होईल, अशी अपेक्षा होती. कारण व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या देशभरात मोठ्या प्रमाणात आहे. पण हा अंदाज फोल ठरला आणि व्हॉट्सअॅपची पेमेंट सेवा म्हणावी तितक्या प्रमाणात यशस्वी झाली नाही.

आपल्या पेमेंट सेवेचा विस्तार करण्यावर भर देण्याचे व्हॉट्सअॅपने ठरवले आहे आणि यासाठीच व्हॉट्सअपला यूजर ग्रुप वाढवायचा आहे. परिणामी आता व्हॉट्सअॅप पेमेंटची मर्यादा वाढवण्यास मंजुरी मिळाल्यामुळे गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि जिओ पे, मोबिक्विक यांना देशात आणखी एक तगडा स्पर्धक मिळणार आहे. याचे कारण म्हणजे लोकांना पेमेंटसाठी वेगळे अॅप इन्स्टॉल करावे लागणार नाही.

व्हॉट्सअॅप मेसेजिंग सेवेचे 400 दशलक्ष वापरकर्ते भारतभर आहेत. व्हॉट्सअॅप पेमेंट सेवेमधून वापरकर्ता मर्यादा एकाच वेळी काढून टाकल्यामुळे एनपीसीआयच्या सिस्टमवर अचानक दबाव येऊ शकतो, हे लक्षात घेऊन एनपीसीआय टप्प्याटप्प्याने व्हॉट्सअॅपच्या पेमेंट सेवेची वापरकर्ता मर्यादा हळूहळू वाढवण्याच्या धोरणावर काम करत आहे. पण, यावर व्हॉट्सअॅप आणि एनपीसीआयकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.