दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला फोटो आला समोर


रोम – दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला फोटो आता समोर आला आहे. अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये जास्त म्युटेशन असल्याचे समोर आले आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा हा फोटो इटलीची राजधानी रोममधील बम्बिनो गेसु रुग्णालयाने प्रकाशित केला आहे. जगाला पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (B.1.1.529) विचार करायला भाग पाडले आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट अतिशय चिंतेचा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) घोषित केले आहे. ओमिक्रॉन हा धोकादायक व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन होतो . याशिवाय सुरुवातीच्या पुराव्यांवरून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. नव्या व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगभरातील देश सतर्क झाले असून हवाई वाहतूकीवर निर्बंध लावले आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरातील लोक चिंतेत असतानाच पहिला फोटो समोर आला आहे. या व्हेरिएंटचे म्युटेशन इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटवर रिसर्च करणाऱ्या टीमने म्हटले आहे की, ओमिक्रोन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक म्यूटेट होत असल्याचे या फोटोमध्ये दिसून येत आहे. हा व्हायरस प्रोटीनच्या वरच्या भागात राहतो. जो मानवी कोशिकांवर प्रभाव टाकतो. हा व्हेरिएंट जास्त म्युटेट होत आहे, याचा असा अर्थ नाही की ओमिक्रॉन अधिक धोकादायक आहे. विषाणूंनी फक्त दुसरा प्रकार निर्माण करून मानवी प्रजाती अधिक अनुकूल बनवली आहे. यासोबतच ते म्हणाले की, या व्हेरिएंटवर आणखी संशोधन सुरु आहे. संशोधन झाल्यानंतरच हा व्हेरिएंट धोकादायक आहे का नाही? हे आम्ही सांगू शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, सुरुवातीच्या पुराव्यात असे समोर आले आहे की, जे लोक आधीच कोरोनाबाधित आहेत, ते पुन्हा ओमिक्रॉन व्हेरिएंटने संक्रमित होऊ शकतात. ओमिक्रॉनमुळे पुन्हा संक्रमणाची भीती आहे. डेल्टा अथवा दुसऱ्या व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉनमुळे जास्त संसर्ग होत असल्याचे अद्याप पर्यंत स्पष्ट झालेले नाही. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा कोरोना प्रतिबंधक लसीवर काय परिणाम होतो, यासाठी जागतिक आरोग्य संघटना काम करत आहे.

ओमिक्रॉनच्या संक्रमणामुळे अधिक गंभीर आजार होऊ शकतात की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच ओमिक्रॉन व्हेरिएंटची वेगळी लक्षणे असल्याचेही समोर आलेले नाही. दक्षिण आफ्रिकामधील रुग्णालयात दाखल होणाऱ्या बाधितांच्या संख्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सुरुवातीच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. पण फक्त ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळेच बाधितांची संख्या वाढत असल्याचेही समोर आलेले नाही. इतर व्हेरिएंटचे आणि समूह संसर्गामुळेही बाधितांच्या संख्येमध्ये वाढ झालेली असू शकते. ओमिक्रॉन व्हेरिएंटची गंभीरता समजण्यासाठी आणखी काही दिवस अथवा आठवडे लागू शकतात.