१ डिसेंबरपासून राज्यातील सुरु होणाऱ्या शाळांबाबत राजेश टोपेंचे मोठे वक्तव्य


मुंबई – सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनने दहशत निर्माण केली आहे. मागील अनुभव पाहता सर्व देशांनी पूर्वकाळजी घेत निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. विदेशी प्रवाशांसाठी केंद्र सरकारनेही नियमावली जाहीर केली असून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. दुससरीकडे रविवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या आदेशाची वाट न पाहता कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. पण या सर्व घडामोडींदरम्यान १ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार असल्यामुळे पालक चिंतेत आहेत. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

१ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार का? असं राजेश टोपे यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, अजून ओमिक्रॉनसंबंधी आपल्या राज्याला अद्याप भीती नाही, कारण त्याची लागण झालेली कुठे दिसत नसल्यामुळे एकदम चिंता करण्याची गरज नाही. १ डिसेंबरला शाळा ठरल्याप्रमाणे सुरु होईल.

मास्क वापरणे गरजेचे असल्याचे सांगत ओमिक्रॉनची लागण होण्याची गती सध्याच्या व्हेरिएंटपेक्षा ५ पटीने जास्त असल्याची माहिती राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर दिली. केंद्राने सांगितलेल्या १३ देशातून येणाऱ्या प्रवाशांना यापुढे थेट विमानतळावर क्वारंटाईन केले जाणार असून आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय विमान प्रवास करता येणार नसल्याचा निर्णय घेतल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. औरंगाबाद, मुंबई, नागपूर पुणे या विमानतळावर देखील प्रवाशांच्या चाचण्या घेतल्या जातील, असेही टोपे यांनी सांगितले. मुंबईहून दिल्लीला जायचे असेल आणि तिथून पुन्हा मुंबईला यायचे असले तरीही RTPCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असायला हवा, अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.