ओमिक्रॉनला रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मोदी सरकारकडून नियमावली जाहीर


नवी दिल्ली – ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये वेगाने होत असल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारतात येणाऱ्या विदेशी प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहे. १ डिसेंबरपासून ही नियमावली लागू होणार आहे. यानुसार विदेशी प्रवाशांना आपल्या १४ दिवसांच्या प्रवासाची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच एअर सुविधा पोर्टलवर आपला निगेटिव्ह आरटीपीआर टेस्ट रिपोर्ट प्रवासाआधी टाकणे बंधनकारक असणार आहे.

विदेशी प्रवाशांच्या चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण आणि त्यांचा प्रवास इतिहास नोंदवण्याचे निर्देश राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीनुसार, धोका असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी केली जाईल. तसेच या चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत, या प्रवाशांना विमानतळावरच थांबावे लागणार आहे. जर रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर त्यांना सात दिवसांसाठी विलगीकरणात राहण्याचा प्रक्रिया पाळावी लागेल. आठव्या दिवशी पुन्हा चाचणी करण्यात येईल. त्यावेळीही रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर सात स्वत: दिवसांसाठी काळजी घ्यावी लागेल.

ज्या देशांमधून धोका नाही तेथील प्रवाशांना विमानतळावरुन जाण्याची परवानगी देण्यात येईल. पण त्यांच्यावरही १४ दिवस लक्ष ठेवावे लागणार आहे. एकूण प्रवाशांच्या पाच टक्के प्रवाशांची विमानतळावर चाचणी केली जाईल. केंद्राने शनिवारी अनेक देशांना धोका असणाऱ्या यादीत टाकले आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका, चीन, बोत्सावना, युके, ब्राझिल, इस्त्राईल, बांगलादेश, मॉरिशिअस, न्यूझीलंड, झिम्बॉम्बे, सिंगापूर आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे.

‘ओमिक्रॉन’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येणार आहे. रविवारी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी तातडीची बैठक घेतली. बैठकीत १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू करण्याबाबत फेरविचाराचा निर्णय घेण्यात आला.