कानपूर कसोटी; रंगतदार कसोटी सामन्यात एका विकेटमुळे लांबला टीम इंडियाचा विजय!


कानपूर – कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर भारत-न्यूझीलंडमध्ये रंगलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात चाहत्यांना रंगतदार क्रिकेटचा थरार पाहायला मिळाला. भारताचा विजय अंधुक प्रकाश आणि एक विकेटच्या अडथळ्यामुळे हिरावला गेला. रचिन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी पाचव्या दिवसाचा खेळ संपायला एक तास शिल्लक असताना झुंजार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना विकेट घेऊ दिली नाही. शेवटी दिवसाचा खेळ संपल्याचा निर्णय पंचानी घेतल्यामुळे दोन्ही संघांमधील हा चित्तथरारक सामना ड्रॉ राखला. पदार्पणात शतक ठोकणाऱ्या श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्कार मिळाला. आता ३ डिसेंबरपासून मुंबईत मालिकेचा दुसरा कसोटी सामना रंगणार आहे.

पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केलेला विल यंग दुसऱ्या डावात जास्त योगदान देऊ शकला नाही. भारताला पहिले यश फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने मिळवून दिले. यंगला (२) त्याने बाद केले. त्यानंतर नाईट वॉचमन विल सोमरविलेला सोबत घेत लॅथमने किल्ला लढवला. या दोघांनी लंचपर्यंत संघाला सावरले. लंचंनंतर वेगवान गोलंदाज उमेश यादवने सोमरविलेचा अडथळा दूर केला. त्याचा अप्रतिम झेल शुबमन गिलने घेतला. सोमरविलेने ३६ धावा केल्या आणि लॅथमसोबत ७६ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर कप्तान केन विल्यमसन मैदानात आला. या दोघांनी संघाचे शतक फलकावर लावले. लॅथमने आपला फॉर्म कायम राखत अजून एक अर्धशतक ठोकले. लॅथम अर्धशतकानंतर अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ५२ धावांची खेळी केली. अनुभवी फलंदाज रॉस टेलर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला रवींद्र जडेजाने बोल्ड केले.

जडेजाने चहापानानंतर न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनला (२४) पायचीत पकडले. तर अक्षरने नव्याने फलंदाजीला आलेल्या हेन्री निकोल्सला माघारी धाडत न्यूझीलंडची अवस्था खिळखिळी केली. शेवटचा एक तास बाकी असताना जेमीसनच्या रुपात न्यूझीलंडला जडेजाने आठवा धक्का दिला. त्यानंतर मात्र रचिन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी निर्धारित वेळेत संयमी फलंदाजी करत भारताला विकेट मिळू दिली नाही. ९८ षटकात ९ बाद १६५ धावांवर पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. रवींद्रने तब्बल ९१ चेंडूंचा सामना करत १८ तर पटेलने २३ चेंडूंचा सामना करत २ धावा केल्या. भारताकडून जडेजाने ४ तर अश्विनने ३ बळी घेतले.