मुंबईत BEST बसने प्रवास करायचा असेल, तर लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक


मुंबई – बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांना आजपासून लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. दक्षिण आफिक्रेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने खबरदारी घेत हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. लोकलनंतर आता बेस्टमध्येही प्रवास करायचा असल्यास लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक करण्यात आले आहे. लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस झाले असतील, तरच बेस्ट बसमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. याशिवाय मास्क वापरणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

लोकल रेल्वे, बेस्ट बस, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस, मेट्रो, मोनो रेलसह स्थानिक परिवहन सेवांच्या बसमध्ये लसीकरण झालेल्यांनाच मास्कसह प्रवेश देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर बेस्ट प्रवाशनानेही लसीकरण सक्तीचे केल्यामुळे बेस्टमध्ये आजपासून प्रवास करायचा असेल, तर लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे.

याबाबत माहिती देताना मुंबई बेस्ट प्रशासनाने सांगितले की, बस सुरु होण्याआधीच मुंबईत अनेक ठिकाणी प्रवाशांना तिकिट दिले जाते. तिकिटे देताना आजपासून लसीकरण प्रमाणपत्र तपासले जाईल. सर्वांना कोविन अॅपवर लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही.