‘गोदावरी’ चित्रपटाला ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार ; तर जितेंद्र जोशी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता


मुंबई : निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ या चित्रपटाने गोव्यातील ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहे, तर अभिनेते जितेंद्र जोशी याला या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘रजत मयूर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा रजत मयूर पुरस्कार गोदावरी नदीचा काठ आणि त्याच्याशी जोडलेले एका व्यक्तीचे भावविश्व उलगडणाऱ्या ‘गोदावरी’ चित्रपटाला विभागून देण्यात आला. रविवारी एका शानदार समारंभात पणजी येथे आठवडाभर रंगलेल्या इफ्फी महोत्सवाचा समारोप करण्यात आला. या महोत्सवाचे कोरोनानंतर पहिल्यांदाच भव्य आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख उपस्थितीत इफ्फीचा समारोप सोहळा रंगला.

जपानी दिग्दर्शक मासाकाझू कानेको यांच्या ‘रिंग वॉन्डिरग’ या चित्रपटाला महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानाचा ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कार देण्यात आला. युद्धग्रस्त जपानमधील विस्मृतीत गेलेल्या आठवणी उलगडणाऱ्या या चित्रपटाने परिक्षकांची मने जिंकली, तर झेक दिग्दर्शक वाक्लॅव कांद्रका यांचा ‘सेव्हिंग वन हु वॉज डेड’ हा चित्रपट इफ्फीत रजत मयूर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

  • निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ हा चित्रपट आणि रॉड्रिगो डी ऑलिव्हेरा दिग्दर्शित ‘द फस्र्ट फॉलन’ चित्रपटातील भूमिकेसाठी ब्राझिलियन अभिनेत्री रेनाटा काव्‍‌र्हालोला विशेष परिक्षकांचा ‘रजत मयूर पुरस्कार’ विभागून देण्यात आला.
  • अभिनेते जितेंद्र जोशी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘रजत मयूर’ पुरस्कार, तर ‘शार्लोट’मधील भूमिकेसाठी स्पॅनिश अभिनेत्री अँजेला मोलिना हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या ‘रजत मयूर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • ‘भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्व – २०२१’ हा पुरस्कार देऊन गीतकार प्रसून जोशी यांना सन्मानित करण्यात आले.