यामुळे राष्ट्रपतींनी काचेच्या पेटीमधूनच पंतप्रधानांना दिली पदाची शपथ


चेक गणराज्य – देशामधील उजव्या आघाडीचे नेते पेट्र फिएला यांची चेक (झेक) प्रजासत्ताकचे राष्ट्रपती मोलीस झामेन यांनी पंतप्रधान पदी नियुक्ती केली. राष्ट्रपती हे रविवारी पार पडलेल्या या शपथविधीदरम्यान काचेच्या पेटीमध्ये बसून होते. राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना काचेच्या पेटीमधूनच पदाची शपथ दिली. पण यामागे एक विशेष कारण आहे.

उजव्या आघाडीच्या पाच पक्षांचे पेट्र हे नेते असून ऑक्टोबर महिन्यात झालेली निवडणूक त्यांनी जिंकली होती. या निवडणुकीमध्ये सध्याचे मावळते पंतप्रधान अँण्ड्रेज बाबीस आणि सहकाऱ्यांचा पराभव झाला. सध्या नवीन सरकारसमोर कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोनाची नवीन लाट हा पहिला गंभीर विषय असेल. त्याचबरोबर ऊर्जा क्षेत्रातील तुटवडा हा सुद्धा नव्या सरकारसमोरील मोठा प्रश्न असणार आहे. पेट्र यांच्या आघाडीने निवडणुक प्रचारादरम्यान २०२२ च्या अर्थसंकल्पामध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.

मोठ्या कठीण काळामध्ये नवीन सरकार सत्तेत आले आहे. आमच्यासमोर बरीच आव्हाने आहेत. भविष्याच्या दृष्टीने बदल घडवणार आमचे सरकार असेल, असे पेट्र यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंत पेट्र यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तर होईल. दरम्यान काल पार पडलेल्या शपथविधीदरम्यान राष्ट्रपतींनी काचेच्या पेटीमध्ये बसून नवीन पंतप्रधानांना शपथ दिली. राष्ट्रपतींना कोरोनाची लागण झाल्यामुशे त्यांनी काचेच्या पेटीत बसून शपथ दिल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. नवीन पंतप्रधानांना शपथ देणं गरजेचे असल्यामुळे या शपथविधीसाठी राष्ट्रपती कोरोनाचा संसर्ग झालेला असतानाही उपस्थित राहिले.

पेट्र यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्याचेही त्यांनी कौतुक केले आहे. चेक देशामध्ये केवळ ५८.५ टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. युरोपीयन महासंघामधील इतर देशांमधील सरासरी लसीकरण हे ६५.८ टक्के एवढे असून त्या तुलनेत या देशातील लसीकरण फारच कमी आहे, अशी माहिती युरोपीयन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन अॅण्ड कंट्रोलने दिली आहे.