अजय देवगणने बदलले आपल्या आगामी चित्रपटाचे नाव, ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट


गेल्या अनेक दिवसांपासून अजय देवगणचं दिग्दर्शन असलेल्या ‘मेडे’ या चित्रपटाची प्रतिक्षा होती. पण या चित्रपटाचे नाव आता बदलले आहे. आता या चित्रपटाचे नाव ‘रनवे ३४’ असे करण्यात आले आहे. चित्रपटाच्या बदललेल्या नावाची घोषणा अजय देवगणने केली आहे. या शिवाय चित्रपटातील मुख्य कलाकार म्हणजे स्वत: अजय देवगण तसेच अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंहचा चित्रपटातील फर्स्ट लूकदेखील शेअर केला आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख त्याने जाहीर केली आहे.


सोशल मीडियावर चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक अजय देवगणने शेअर केला आहे. त्याने हे फोटो शेअर करताना मे-डे आता ‘रनवे ३४’ झाला आहे. हा थ्रीलर चित्रपट खऱ्या घटनांशी प्रेरित आहे असून तो माझ्या खूप जवळचा आहे. यामागे अनेक कारणे असल्याचे म्हटले आहे. त्याने यासोबतच एक नोटही शेअर केली आहे. यात त्याने लिहिले, आपले डोळे बंद करा आणि त्या क्षणांचा विचार करा, जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच… तो म्हणजे जेव्हा आपल्याला आपण संपूर्ण जग जिंकलो आहोत, असे वाटते पण दुसऱ्याच क्षणी आपण खूप हताश झाल्यासारखे वाटते.


अजय आणि रकुल एका वैमानिकाच्या भूमिकेत चित्रपटात झळकणार असल्याचे या चित्रपटाच्या पोस्टरवरुनच स्पष्ट होत आहे. तर अमिताभ बच्चन मात्र कोणत्या भूमिकेत झळकणार हे अद्यार गुलदस्त्यामध्ये आहे. २०२२ सालामधील ईदला म्हणजेच २९ एप्रिलला ‘रनवे ३४’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटात बिग बी आणि रकुल प्रीत सिंह सोबतच बोमन ईरानी, अकांक्षा सिंह, अंगीरा धर हे कलाकारही झळकणार आहेत.