आदित्य ठाकरेंची धक्कादायक माहिती; मुंबईत गेल्या १९ दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून आले एक हजारांच्या आसपास प्रवासी


मुंबई – संपूर्ण जगावर सध्या कोरोनाचा नवा विषाणू ऑमिक्रॉनमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या १९ दिवसांत एक हजारांच्या आसपास प्रवासी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. ऑमिक्रॉन आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये वेगाने फैलावत असल्यामुळे संपूर्ण जगाला चिंता सतावत आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूचा शोध दक्षिण आफ्रिकेत लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत. तेथून येणाऱ्या प्रवाशांवर केंद्र सरकारसोबत राज्य सरकारने निर्बंध आणले असताना आदित्य ठाकरेंनी दिलेल्या माहितीने राज्याची चिंता वाढवली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतून १० नोव्हेंबरपासून एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. जे लोक आतापर्यंत आले आहेत, त्यांची माहिती आपण मिळवली आहे. मुंबईत जे आहेत, त्यांना पालिकेकडून फोन केले जात आहेत. त्याचबरोबर गेल्या १० दिवसांतील परदेशातून आलेल्या सर्वांना संपर्क साधून विचारपूस केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था केली जात असल्याचेही ते म्हणाले आहेत.

आज मंत्रिमंडळ बैठकीत करोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत राहावी, जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असे सांगितले.