बिहार न्यायालयाने २४ तासांत बलात्कार प्रकरणात ऐतिहासिक निर्णय सुनावत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा


अररिया – अनेक महत्त्वाचे असे खटले देशातील अनेक न्यायालयात प्रलंबित आहेत. पण बिहार न्यायालयात साक्ष, वाद-विवाद आणि निर्णय हे सर्व एकाच दिवसात दिल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे. एका दिवसात बिहारमधील अररिया जिल्हा न्यायालयाने निकाल देऊन संपूर्ण देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा न्यायालयाने पोक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याची सुनावणी करताना त्याच दिवशी साक्ष व युक्तिवाद ऐकून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सध्या सर्वत्र न्यायालयाच्या या निर्णयाची चर्चा होत आहे. पॉक्सो कायद्यासाठी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत राय यांनी हा निर्णय दिला आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा गुन्हा २३ जुलै रोजी अररियातील नरपतगंज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. आरोपीला अटक करून १८ सप्टेंबर रोजी या प्रकरणाच्या तपास अधिकारी रिता कुमारी यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायाधीश शशिकांत राय यांच्या न्यायालयाने या प्रकरणी २० सप्टेंबर रोजी दखल घेतली आणि २४ सप्टेंबर रोजी आरोप निश्चित केले.

त्यानंतर त्याच तारखेला एकूण १० साक्षीदारांची साक्ष ऐकून घेतली आणि त्याच दिवशी पॉक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश शशिकांत राय यांनी आरोपी दिलीप यादव याला दोषी ठरवून जन्मठेप आणि ५० हजार दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, न्यायालयाने सरकारला पीडितेला सात लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायाधीश शशिकांत राय यांनी याआधीही, १० वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर झालेल्या हत्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला होता. न्यायालयाने या निकालात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. याआधी ४ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दुसऱ्या एका प्रकरणात शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात राहण्याची शिक्षा सुनावली होती. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-६ पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत राय यांनी हे दोन्ही ऐतिहासिक निर्णय सुनावले आहेत.

पीडित मुलीवर २२ जुलै रोजी बलात्कार झाला होता आणि दुसऱ्या दिवशी एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची तपास अररिया महिला पोलिस स्टेशनच्या प्रभारी रिता कुमारी यांनी केला होता. पत्रकारांशी संवाद साधताना सरकारी वकील श्यामलाल यादव म्हणाले, अररिया येथील खटला हा देशातील बलात्काराच्या खटल्याचा सर्वात वेगवान खटला होता. या खटल्यामुळे मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील एका न्यायालयाचा विक्रम मोडीत निघाला.