ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमिवर राज्यात निर्बंध लागू होणार?; अजित पवार म्हणतात…


पुणे – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट आत्ता कुठे तरी कमी होत असल्याची चिन्हे दिसत असतानाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. जगभरातील सर्वच देशांची चिंता दक्षिण आफ्रिकेसह बोट्स्वाना, हाँगकाँग या भागात आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली आहे. याबाबत देशातील महत्त्वाची वैद्यकीय संस्था असलेल्या एम्सने गंभीर इशारा दिला आहे. हा नवीन व्हेरिएंट रोखण्यासाठी राज्यात देखील तयारी सुरु झाली आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत याबाबत बैठक घेतील, असे देखील त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी परदेशातील येणाऱ्या विमानांबाबतही चर्चा करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. ते पुण्यात कोरोना आढावा बैठकीत बोलत होते. अजित पवार म्हणाले, आपल्याकडील परिस्थिती बरी आहे. परंतु जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. याबाबत पंतप्रधान देशातील मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. राज्यात नवीन व्हेरिएंट आला, तर काही बंधने आणावी लागतील अशी स्थिती आहे. सध्या पुणे जिल्ह्यात समारंभांसाठी ५० टक्के उपस्थितीचे बंधन हटवण्यात आले आहे. आता शाळा देखील पूर्ण क्षमतेने सुरू करत आहोत. तसेच १ डिसेंबर पासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत.

३१ डिसेंबरपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटर सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यावेळी आढावा बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तसेच सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला नियमांचे पालन करून परवानगी असणार आहे. केंद्र सरकार जी नियमावली विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत तयार करेल तिचे पालन केले जाईल, अशी माहिती देखील अजित पवार यांनी दिली.

अजित पवार एसटी संपाबाबत म्हणाले, तुटेपर्यंत कुठलीच गोष्ट तानायची नसते. एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करत असताना प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचा विचार करावा लागेल. बाकीच्या राज्यात मिळणाऱ्या पगाराच्या जवळपास एसटी कर्मचाऱ्यांना आणले आहे. जेव्हा ते नोकरीला लागले, तेव्हा सरकारी नोकरीत लागले नव्हते. आता हा विषय संपवला पाहिजे. सरकार एक दोन पावले पुढे आले असून त्यांनी देखील पुढे आल पाहिजे.