महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रोन व्हेरिएंटचा प्रभाव किती आहे किंवा असू शकेल? या मुद्द्यावर राजेश टोपेंचे स्पष्टीकरण


जालना – जगभरातील शास्त्रज्ञांची चिंता दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या ओमिक्रोन या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर काही देशांनी बंदी देखील घातली आहे. शास्त्रज्ञ हा नवा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन चर्चा केलेली असतानाच या व्हेरिएंटचा प्रभाव आणि परिणाम महाराष्ट्रात कितपत आहे किंवा जाणवू शकेल, याविषयी नागरिकांमध्ये संभ्रमयुक्त भिती दिसून येत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावर जालन्यामध्ये बोलताना खुलासा केला आहे.

देशात आणि महाराष्ट्रात ओमिक्रोन व्हेरिएंटमुळे लगेच परिणाम व्हावा अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. डेल्टाने दुसरी लाट निर्माण केली, तशी तिसरी लाट अशा वेगळ्या एखाद्या व्हेरिएंटमुळे निर्माण होण्याची शक्यता असली, तरी त्याचा प्रसार आपण वेळेत थांबवला, तर आज चिंता करण्याचे कारण नाही. फक्त सतर्क राहावे लागेल एवढे मात्र नक्की, असे राजेश टोपे म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यातून साधारणपणे महिन्याला आपण १०० सॅम्पल्स घेतो. त्यांचे जिनोमिक सिक्वेन्सिंग करतो. त्यातून डेल्टा व्हेरिएंटच आहे की अजून काही नवीन व्हेरिएंट आहेत, हे तपासत असतो. हा प्रकल्प अजूनही सुरूच आहे. त्यात अजून तरी नवीन कोणताही नवीन व्हेरिएंट आढळलेला नाही. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे काम आपण करू, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

दक्षिण आफ्रिकेतील काही देशांमध्ये ओमिक्रोन व्हेरिएंट आढळल्यानंतर त्याची भिती महाराष्ट्रात देखील जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर १ डिसेंबरपासून राज्य सरकारने सर्व शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय फिरवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजेश टोपे यांनी यावर बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. राज्य सरकारने १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या विभागाची वर्षा गायकवाड यांच्या या प्रस्तावावर ना हरकत आहे. त्यानुसार अंमलबजावणी होईल. तरीदेखील मुख्यमंत्री उद्या संध्याकाळी संपूर्ण प्रशासन आणि आरोग्य विभागाची व्हीसी घेऊन आढावा घेणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने देखील मान्य केले आहे की हा एक नवीन व्हेरिएंट आहे. त्याचे स्वरूप अधिक समजून घेण्यासाठी अभ्यास सुरू आहे. ते त्यानुसार सगळ्याच देशांना कळवतील. आपल्याला त्यांच्या सूचना येतील, त्यानुसार आपण काम करू. सध्या देशात अशा प्रकारचा कोणताही नवीन व्हेरिएंट आढळलेला नाही. तातडीच्या सूचना आपण दिल्या आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या वेगवेगळ्या प्रदेशातून येणाऱ्या लोकांना ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केले आहे. ते आल्यानंतर त्यांचे आपण स्वॅब घेत आहोत. अजूनही त्यांच्या विमानांवर पूर्णपणे बंदी घातलेली नसल्याचे टोपेंनी स्पष्ट केले.