कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार उचणार ‘ही’ पावले


मुंबई – दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या नव्या व्हेरिएंटमुळे जगातील अनेक देश सतर्क झाले असून कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पावले उचलली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही सतर्क झाले असून या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेतून सुरू असणाऱ्या विमान सेवेवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला होता. आफ्रिका खंडातील इतर देशांमध्येही कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव फैलावला आहे. या नव्या व्हेरियंटचे बोत्सवानामध्ये 32 म्युटेशन आढळले आहेत. हा व्हेरिएंट अधिक वेगाने फैलावत असल्यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा सुरू असल्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्क झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील विमान उड्डाणांवर बंदी घालण्याचा केंद्र आणि राज्य सरकार विचार करत आहे. तर, येत्या 3 डिसेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू होणाऱ्या भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावरही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे सावट आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या कसोटी सामन्यात 50 टक्केच प्रेक्षक क्षमता केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.