बँकिंग क्षेत्रात टाटा, बिर्ला आणि रिलायन्सला प्रवेश नाही ; रिझर्व्ह बँकेने फेटाळली मागणी


मुंबई : टाटा, रिलायन्स आणि बिर्ला ग्रुपच्या उद्योग विस्ताराच्या स्वप्नावर पाणी फेरण्याची शक्यता आहे. बँकिग सेक्टरमध्ये येण्याची परवानगी टाटा, रिलायन्स आणि बिर्ला ग्रुपने मागितली होती, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही मागणी फेटाळल्याची माहिती आहे. औद्योगिक घराण्यांना कमर्शिअल बँका चालवता येणार नसल्याची भूमिका सध्यातरी रिझर्व्ह बँकेने घेतली आहे.

एक हजार कोटींचे भांडवल आणि 26 टक्के भागिदारी ही मूळ मालकांकडे म्हणजे प्रमोटर्सकडे बँका चालवण्यासाठी असणे गरजेचे आहे. 15 टक्के एवढी ती आधी होती. त्यानुसार आरबीआयच्या एका इंटर्नल वर्किंग कमिटीने दिलेल्या 33 सल्ल्यांपैकी 21 सल्ले आरबीआयने स्वीकारले आहेत आणि याच सल्ल्यानुसार आता टाटा रिलायन्स आणि बिर्ला समूहाला बँकिंग क्षेत्रात पाऊल ठेवता येणार नाही.

बँकिंग क्षेत्रात यायला अशा औद्योगिक घराण्यांशी संबंधित कंपन्याना राजकीय नेत्यांसह काही माजी बँकर्सचाही विरोध असल्याचे दिसून येते. तर यावेळी आरबीआयने एनबीएफसीसाठी देखील कठोर नियम केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे बँकिंग व्यवसाय सुरु करण्याच्या टाटा, बिर्लासारख्या बड्या उद्योगांच्या स्वप्नावर पाणी फेरण्याची शक्यता आहे.

बँकांच्या नियमांप्रमाणे गैर-बँकिंग वित्तीय कंपन्यांना नियंत्रित करणाऱ्या नियमांना कडक करण्याची घोषणा आरबीआयने केली आहे. तसेच पेमेंट बँकांचे रुपांतर छोट्या बँकांमध्ये करण्याची मागणी आरबीआयने नाकारली आहे. याचा परिणाम पेटीएमवर होणार आहे.