कोरोना निर्बंध शिथिल होत असतानाच नवा आदेश राज्य सरकारकडून जारी


मुंबई – राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर आता ज्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले आहे, अशांसाठी राज्य सरकार आता आर्थिक, सामाजिक, मनोरंजन आणि सांस्कृतिक उपक्रम कमी निर्बंध ठेवून सुरू करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे आता कोरोना पूर्व काळाप्रमाणे पुन्हा एकदा या सर्व बाबी स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्यानुसार व काही अटी राखून सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे.

राज्य आणि केंद्र सरकारने कोविडच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये सेवा पुरवठादार, जागा मालक, संस्था याचबरोबर प्रवासी, सेवा घेणारे, ग्राहक, पाहुणे आदी सर्वांसाठी हे बंधनकार असणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड असणार आहे.

  1. एका संस्थेशी निगडीत असलेले किंवा एखादा कार्यक्रम, खेळ, सर्व सेवा पुरवठादार, एखाद्या उपक्रमात अथवा कार्यक्रमात सहभागी होणारे(खेळाडू, कलाकार इत्यादी) भेट देणारे, पाहुणे, ग्राहक या सर्वांचे संपूर्ण लसीकरण आवश्यक आहे.
  2. त्याचबरोबर, एखादे दुकान, मॉल, इव्हेंट, संस्था, एकत्र येण्याचे ठिकाण इत्यादी जिथे अनेकजण नागरिक येतात अशा ठिकाणी पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्ती असणे आवश्यक आहे. शिवाय, या ठिकाणी येणारे ग्राहक देखील पूर्णपणे लसीकरण झालेले असावेत.
  3. पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींकडून सर्व सार्वजनिक वाहतुक ही वापरली गेली पाहिजे. राज्य सरकारकडून युनिव्हर्सल पास तयार करण्यात आलेला आहे. जो पूर्णपणे लसीकरण झालेले असल्याच पुरावा असेल किंवा कोविन अॅपवरील सर्टिफिकेट हे अधिकृत ओळखपत्रासह ज्यावर फोटो असेल, ते देखील पुरवा असेल.
  4. सरकारी किंवा शाळेने दिलेले ओळखपत्र १८ वर्षांच्या खालील व्यक्तींसाठी असेल आणि जे वैद्यकीय कारणास्तव लस घेण्यास असमर्थ आहेत, अशांनी अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र अशा ठिकाणी जातांना दाखवावे.
  5. त्याचबरोबर ज्या कार्यालयांमध्ये किंवा संस्थामध्ये सामान्य नागरिक येण्यास किंवा खासगी वाहतुकीस मूभा नसते, ती ठिकाणे केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच हे खुली असण्याची आवश्यकता नाही, पण त्या लोकांनी संपूर्ण लसीकरण करून घ्यावे.
  6. राज्यात आंतरराष्ट्रीय ठिकाणांवरून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी केंद्र शासनाने सूचना केलेल्या आहेत. सर्व देशांतर्गत प्रवासी हे पूर्णपणे लसीकरण झालेले असावेत किंवा त्यांची ७२ तासांसाठी वैध असलेली आरटीपीसीआर टेस्ट झालेली असावी.त्याचबरोबर एखाद्या बंदिस्त ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमास, चित्रपटगृहात, नाट्यगृहात, कार्यालयात, हॉलमध्ये तेथील क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीस परवानगी असेल.