ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय!


मुंबई – कोरोनाचा नवा व्हेरिएंट अर्थात ओमिक्रॉनचे रुग्ण आधी दक्षिण आफ्रिका आणि नंतर इस्त्रायलमध्ये देखील आढळल्यामुळे जगभर पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. एकीकडे तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना दुसरीकडे कोरोनाचा नवा प्रकार आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेशी दळणवळणावर काही देशांनी निर्बंध घातले. या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेले शहर अर्थात मुंबईमध्ये देखील चिंतेचे वातावरण दिसू लागले आहे. ओमिक्रोन या कोरोनाच्या नव्या प्रकाराशी दोन हात करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने तयारी सुरू केली असून यासंदर्भात मोठा निर्णय घेतला.

यासंदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईत दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाईन करावं, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या प्रवाशांच्या शरीरातून घेण्यात आलेले नमुने जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येतील, असे देखील महापौर म्हणाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.