माझ्याविरोधात अनेकजण रचत आहेत षडयंत्र, नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप


मुंबई – : पुन्हा एक खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. माझ्याविरोधात षडयंत्र रचण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. अनिल देशमुखांप्रमाणे मला देखील अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जो खेळ अनिल देशमुख यांच्यासोबत झाला, तोच माझ्यासोबत केला जात असल्याचे मलिक म्हणाले.

मलिक यांनी म्हटले की, मला देखील अनिल देशमुख यांच्याप्रमाणे अडकवण्याचा प्रयत्न होत असून तसे पुरावेच माझ्या हाती लागले आहेत. काही अधिकारी लोकांना माझ्या विरुद्ध मसुदा तयार करून इमेल करत आहेत आणि त्यांना माझ्या विरुद्ध तक्रार करायला लावत आहेत. त्यामुळे मी याविरोधात कमिशनर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील तक्रार करणार आहे. अशा तक्रारींची चौकशी करायला लावणार असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत मलिक यांनी म्हटले आहे की, गेले 2 महिने मला काही लोक माहिती देत होते की काही पक्षाचे कार्यकर्ते माझ्या घराची आणि ऑफिसची माहिती घेत आहेत. माझ्या नातवांची देखील माहिती घेण्यात येत आहेत. ते कुठं शाळेत जातात, यावर देखील त्यांचे लक्ष आहे. दुबईला मी असताना दोन जण माझ्या घराचे फोटो काढत होते. हे करत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडले असल्याचे मलिक म्हणाले. मी पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार देणार आहे आणि सीपी यांना देखील पत्र लिहिणार आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट करत आपली रेकी केल्याचा दावा केला आहे. रेकी करणाऱ्या व्यक्तींचा गाडीसह फोटो पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गाडीत बसून हे लोक गेल्या काही दिवसांपासून माझी आणि शाळेची रेकी करत आहे. जर यांना कुणी ओळखत असेल, तर मला माहिती द्या. जे लोक या फोटोत आहेत. त्यांना मला सांगायचे आहे की, तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर मला भेटा, सर्व माहिती देईल. दोन व्यक्तींचे फोटो पोस्ट करत हा दावा नवाब मलिकांनी केला आहे. दोन लोक रेकी करत असलेल्या गाडीचा क्रमांक MH 47 AG 2466 असा आहे. यामध्ये एका व्यक्तीच्या हातात कॅमेराही दिसत असल्यामुळे नवाब मलिकांच्या दाव्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.