फार काळ टिकणार नाही महाविकास आघाडी सरकार; रामदास आठवलेंचे भाकित


सांगली – नुकतेच राज्यातील सरकार पुढील वर्षी बदलण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वक्तव्य केले होते. भाजपचे सरकार राज्यात लवकरच येणार असल्याचे वक्तव्य नारायण राणेंनी केल्यानंतर आता अजून एक केंद्रीय राज्यमंत्री असलेले रामदास आठवले यांनी देखील राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याविषयी भाकित वर्तवले आहे. नारायण राणेंच्या वक्तव्याविषयी सांगलीमध्ये पत्रकारांनी विचारणा केली असता रामदास आठवलेंनी त्याला दुजोरा दिला. तसेच, राज्यात अडीच वर्ष झाल्यानंतर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, असे देखील रामदास आठवले म्हणाले आहेत.

शुक्रवारी माध्यमांशी बोलताना नारायण राणेंनी याविषयी वक्तव्य केले होते. भाजपचे सरकार महाराष्ट्रात नसल्यामुळे येथे तसे होत आहे. महाराष्ट्रात लवकरात लवकर भाजपचे सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे, ती आत्ताच बाहेर सांगायची नाही. एखादे सरकार पाडायचे असेल आणि नवे सरकार स्थापन करायचे असेल, तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो, तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल, असे राणे म्हणाले होते.

दरम्यान, राणेंच्या वक्तव्याविषयी विचारणा केली असता रामदास आठवलेंनी त्याला दुजोरा दिला. यांच्यात एवढा वाद आहे की कदाचित अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर कदाचित शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत जाऊ शकते. राणेंनी आपली भूमिका मांडली. असे घडेल असे राणेंना वाटते. मला वाटते की हे सरकार फार काळ टिकणार नाही. मार्च असो वा एप्रिल. सरकार लवकर जाईल अशी अपेक्षा असल्याचे आठवले म्हणाले.

केंद्राने तिन्ही कृषि कायदे मागे घेतल्यानंतर देखील शेतकरी आंदोलनावर ठाम असल्यामुळे रामदास आठवले यांनी राकेश टिकैत यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. पण आता तिन्ही कायदे मागे घेण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यायला हवे. ते होत नसेल, तर राकेश टिकैत आणि इतर नेत्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. कायदे मागे घेतल्यानंतरही ऊठसूट आंदोलन करणे योग्य नाही. आता आंदोलनाची आवश्यकता नाही. इतर मुद्द्यांवर चर्चेतून मार्ग काढता येऊ शकतो, असे आठवले म्हणाले.