भारत-पाक सामन्याच्या एक महिन्यानंतर इंझमामने दिली प्रतिक्रिया


लाहोर – पाकिस्तानने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचा पराभव केला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक गमावली आणि संघाला १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने एका महिन्यानंतर या सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाला, कारण नाणेफेकीपूर्वी त्यांच्या खेळाडूंवर दबाव असल्याचे इंझमामने म्हटले. त्याने यावेळी ‘भयभीत’ या शब्दाचाही उल्लेख केला.

पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर ५१ वर्षीय इंझमाम म्हणाला, विराट कोहली आणि बाबर आझमला जेव्हा मी नाणेफेक दरम्यान पाहिले, तेव्हा हे स्पष्ट झाले की भारतीयांवर खूप दबाव आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने बाद करण्यापूर्वीच भारतावर दबाव होता. इंझमाम पुढे म्हणाला, ते सामन्यापूर्वीच दडपणाखाली होते आणि त्यामुळेच त्यांचा १० विकेट्सने पराभव झाला. तुम्ही त्याचे शारीरिक हावभाव पाहू शकता. ते भयभीत दिसत होते, तर पाकिस्तानचे खेळाडू सामना जिंकण्यासाठी अधिक आत्मविश्वासू आणि उत्साही होते. विश्वचषकाच्या सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव होण्याची ही पहिलीच वेळ होती.

सुरुवातीपासूनच विजेतेपदाचा भारत दावेदार होता, पण त्यांना खूप दबावामुळे विजयापासून दूर ठेवले. भारतीय संघ कधीही टी-२० विश्वचषकात आपल्या खेळाडूंप्रमाणे खेळत नाही. ते एक चांगले टी-२० संघ आहेत यात शंका नाही. गेल्या २-३ वर्षातील त्याची कामगिरी पाहिली, तर खरोखरच खूप छान प्रवास असल्याचेही इंझमामने म्हटले.