एकदा नव्हे तर दोनदा मृत्यूच्या दारात जाऊन परत आले आहेत गौतम अदानी


सध्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्ती विषयी आणि वाढत्या उद्योगांविषयी जोरदार चर्चा होत आहे. पण, तुम्हाला हे माहिती आहे का? एकदा नव्हे तर दोनदा ५८ वर्षीय अदानी हे मृत्यूच्या दारात जाऊन परत आले आहेत. पहिल्यांदा अपहरण झाल्यानंतर अदानी सुखरूप बचावले होते. त्याचबरोबर मुंबईवर २००८ मध्ये दहशतवादी हल्ल्यात देखील ते थोडक्यात बचावले होते.

१९७८ मध्ये हिऱ्यांच्या कंपनीत कामासाठी गौतम अदानी मुंबईत आले. त्यांनी येथे महेंद्र ब्रदर या कंपनीत जवळपास २-३ वर्षे काम केल्यानंतर मुंबईतील झवेरी बाजार येथे त्यांनी स्वतःची हिऱ्यांची कंपनी सुरू केली. त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षणमध्येच सोडून देत हिऱ्यांच्या व्यापारात उडी घेतली होती.

गौतम अदानी या व्यवसायात हात बसल्यानंतर १९८१ मध्ये चुलत भावाच्या पॉली विनाईल क्लोराईडच्या व्यवसायात मदत करण्यासाठी अहमदाबादला आले. यानंतर त्यांनी १९८८ मध्ये अदानी एक्सपोर्ट नावाने निर्यातीचा व्यापार सुरू केला. पण, अदानींचे १९९७ मध्ये अपहरण झाले. त्यांच्या सुटकेसाठी आरोपींनी १०-११ कोटी रुपयांची मागणी केली होती.

पोलिसांनी १ जानेवारी १९९८ रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, गौतम अदानी आणि शांतीलाल पटेल यांच्या गाडीसमोर एक स्कुटर आडवी आली. त्यानंतर गाडी थांबल्यावर कर्णावती क्लब येथे एका व्हॅनमधून काही लोक आले आणि त्यांनी या दोघांच्या डोक्यावर बंदूक ठेऊन अपहरण केले आणि त्यांना अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले होते.

या अपहरणाचा अंडरवर्ल्ड डॉन फजल-उर-रहमान उर्फ फजलू रहमान याच्यावर आरोप झाला. पण यातून अदानी सुखरुप सुटले. या विषयावर अदानी खूप कमी बोलतात. लंडनच्या फायनान्शियल टाईम्सने घेतलेल्या मुलाखतीत याविषयी एकदा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, माझ्या आयुष्यात २-३ दुर्दैवी प्रसंग घडले आहेत. अपहरणाचा प्रकार त्यापैकीच एक आहे.

त्यानंतर मुंबईवर २००८ मध्ये दहशतवादी हल्ला झाला. प्रसिद्ध ताज हॉटेलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. गौतम अदानी त्यावेळी याच हॉटेलमध्ये एका उद्योगपतीसोबत जेवण करत होते. गोळीबार आणि हँड ग्रेनेडचा वापर झाल्यानंतर ताज हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांनी अदानी यांच्यासह तिथे उपस्थित सर्वांना बेसमेंटमध्ये नेले. अदानी तेथे २६ नोव्हेंबरचा पूर्ण दिवस होते.

या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच उद्योगपती घाबरले होते. प्रत्येकजण जीव वाचावा अशी प्रार्थना करत होता. अदानी यांनी याचवेळी घरच्यांशी फोनवर बोलून त्यांना आधार दिला. अखेर दुसऱ्या दिवशी त्यांना हॉटेलच्या मागच्या बाजूने बाहेर काढण्यात आले. यानंतर ते अहमदाबादमध्ये पोहचल्यावर आपण मृत्यूला १५ फूट अंतरावरून पाहिल्याचे त्यांनी म्हटले.