महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षातील कामगिरीबाबत फडणवीसांची थोडक्यात प्रतिक्रिया


पुणे – राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकार आपली दोन वर्ष पूर्ण करत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीबाबत आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, त्यावर फडणवीस यांनी अगदी थोडक्यात प्रतिक्रिया दिली.

दोन वर्षे महाविकास आघाडी सरकारला पूर्ण होत आहेत, तुम्ही कशापद्धतीने त्यांच्या कामगिरीकडे पाहता? या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, सरकारची कामगिरीच नेमकी काय आहे की ज्यावर मी बोलू. जिथे कामगिरी असते, तिथे मूल्यमापन केले जाते. सरकारची कामगिरीच नसल्यामुळे मूल्यमपान करण्याचा प्रश्नच येत नाही तसेच मला आनंद आहे की आजही राज्यातील नंबर १ चा पक्ष हा भाजपच असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबीयांची आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पर्वती येथील घरी जाऊन आज भेट घेतली. फडणवीस पुरंदरे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांची सेवा करत करत प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि विशेषता युवकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आणि आता ते निघून गेल्यानंतर, त्यांनी जे स्वप्न बघितले होते की अतिशय उत्तम प्रकारची शिवसृष्टी तयार झाली पाहिजे. त्यांनी ते हाती घेतलेले काम हे अपूर्ण आहे, हे कोणा एका व्यक्तीचे काम नाही, यासाठी संपूर्ण समाजाला उभे राहावे लागेल. आम्ही लोक आपल्यापरीने ही शिवसृष्टी पूर्ण करण्याकरिता जी काही आमच्यापरीने मदत करता येईल, ती निश्चितपणे करू. पण मला असे वाटते की तमाम शिवप्रेमींचे हे स्वप्न आहे आणि ही जबाबदारी देखील आहे की, एक जागतिक दर्जाची शिवसृष्टी ही तयार झाली पाहिजे.

उदयनराजे भोसले यांनी अशी मागणी केलेली होती की, या शिवसृष्टीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून आर्थिक मदत करणे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही काय पाठपुरवा करणार आहात का? यावर फडणवीस म्हणाले, आमचे सरकार जेव्हा होते, त्यावेळेस आम्ही, त्या शिवसृष्टीला एक दर्जा दिलेलाच आहे. त्यामुळे आता केंद्राला किंवा राज्याला विशेषता मदत करायची असेल, तर त्यात कुठली अडचण नाही. मला असे वाटतं की त्याला मदत करण्यास कुणाची ना देखील नसेल, त्यामुळे जरूर त्यांची मदत देखील आपण घेऊया.

त्याचबरोबर, दिल्लीत काल माझी कुठलीही राजकीय भेट नव्हती. दिल्लीत आम्ही गेलो की आमच्या नेत्यांबरोबर जाऊन चर्चा करत असतो. राज्यात काय सुरू आहे याबाबतची माहिती त्यांना देतो. काल मुख्य उद्देश हा संघटनात्मक बैठकीचा होता. दिल्ली संघटनात्मक बैठकीला चंद्रकांत पाटील आणि मी गेलो होतो. जवळपास तीन-चार तास आमची संघटनात्मक बैठक होती, अशी माहिती फडणवीस यांनी कालच्या दिल्ली दौऱ्याबाबत दिली.