मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ईडीचा अर्जुन खोतकरांच्या घरी मुक्काम!


जालना – सध्या ईडीच्या रडारवर शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर असून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. अर्जुन खोतकर यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिल्यानंतर देखील अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील निवासस्थानी आणि त्यांच्याशी संबधित जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर काही दिवसांतच ईडीने छापा टाकला. महाविकासआघाडीचे काही मंत्री आणि नेत्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये ईडीने छापेमारीची कारवाई केली आहे. त्यामध्ये आता अर्जुन खोतकर यांच्या नावाचा देखील समावेश झाला आहे.

शुक्रवारी सकाळीच अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील निवासस्थानी ईडीचे पथक पोहोचले. सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेला छापा थेट मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरूच होता. यादरम्यान, ईडीने सखोल तपास केला असून आज देखील ही चौकशी सुरू असणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जेव्हा छापा पडला, तेव्हा अर्जुन खोतकर घरीच असल्याचे सांगितले जात आहे. जालना सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहाराशी संबंधित दोन उद्योजकांवर काही दिवसांपूर्वीच ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर किरीट सोमय्यांनी अर्जुन खोतकर यांना लक्ष्य केले होते.