खंडणीप्रकरणी आता सीआयडीकडून परमबीर सिंह यांना २ समन्स


मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सीआयडीने समन्स बजावले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांना २ प्रकरणात दोन वेगवेगळ्या दिवशी हजर राहण्यासाठी सीआयडीने समन्स पाठवले आहे. एक समन्स मरीन ड्राईव्ह येथे श्यामसुंदर अग्रवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत आहे, तर दुसरा ठाण्यातील खंडणी प्रकरणी आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांची सोमवार आणि मंगळवार अशी दोन दिवस चौकशी होणार आहे.

दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंह यांना दोन समन्स पाठवण्यात आली आहेत. त्यापैकी मरीन ड्राईव्हला दाखल गुन्ह्याप्रकरणी सोमवारी (२९ नोव्हेंबर) चौकशी होईल, तर ठाण्यातील खंडणी प्रकरणी मंगळवारी (३० नोव्हेंबर) सीआयडी चौकशी करेल. एकूणच आता परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे सीआयडीने याआधी एका अट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास करताना परमबीर सिंह यांचा चंदीगडला जाऊन जबाब नोंदवला होता.