दबंग पोलीस अधिकारी शिवदीप लांडे पुन्हा बिहार पोलिसात दाखल

बिहार राज्यात आपल्या कार्यतत्परतेने दबदबा निर्माण करून बिहारी जनतेत लोकप्रिय झालेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे पुन्हा एकदा आपल्या बिहार केडर मध्ये परतले असल्याचे समजते. महाराष्टात एटीएस विभागात उपमहानिरीक्षक पदाचा लांडे यांचा कार्यकाल नुकताच पूर्ण झाला असून शुक्रवारी त्यांचा या विभागात सेवेचा शेवटचा दिवस होता. १ डिसेंबर पासून ते पुन्हा त्यांच्या बिहार केडर मध्ये रुजू होत आहेत.

२००६ च्या बॅचचे आयपीएस शिवदीप यांनी मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया स्फोटक केसमधील एसयूव्ही, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण तपास करून उकलले असल्याचे सांगितले जाते पण या प्रकरणाचा ताबा नंतर एनआयए कडे दिला गेला होता. शिवदीप महाराष्ट्रातील शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. शिवतारे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते तसेच जलसंधारण राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. पण २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. शिवतारे यांच्या कन्या डॉक्टर आहेत.

शिवदीप लांडे पाटणा येथून मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे अमलीपदार्थ विरोधी पथकाची जबाबदारी दिली गेली होती. तेथेही त्यांनी उत्तम काम केले आहे. ते प्रथम चर्चेत आले ते बिहार मध्ये २०१५ मध्ये. त्यावेळी लाच मागणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी गमछा टाकून पकडले होते. इन्स्पेक्टर सर्वचंद या उत्तरप्रदेशातील पोलीस अधिकाऱ्याने दोन व्यापारी भावांकडे जुनी केस काढून टाकण्यासाठी लाच मागितली होती. या भावांनी लांडे यांच्या कानावर हा प्रकार घातला तेव्हा शिवदीप लांडे भर चौकात वेश बदलून हजर झाले आणि लाच देताना त्यांनी रंगेहात सर्वचंद यांना पकडले होते.