अशी लावली जाते जुन्या विमानांची विल्हेवाट

माणूस असो वा मशीन. त्यांना कधी ना कधी निवृत्ती घ्यावी लागते. त्यामुळे जुन्या कार्स, दुचाकी जश्या मोडीत काढल्या जातात तशीच विमाने सुद्धा मोडीत काढली जातात. जे विमान निवृत्त होणार त्याची शेवटची फ्लाईट कुठे जाते, तेथे काय होते याचे कुतूहल अनेकांना असते. विमानाचे सर्वसाधारण आयुष्य २५ वर्षांचे मानले जाते. अतिशय उत्तम देखभाल असेल तर आणखी ५ -७ वर्षे विमान वापरले जाते. या विमानांची शेवटची फ्लाईट स्टोरेज डेपो अशी असते. यालाच एअरप्लेन बोनयार्ड किंवा ग्रेव्हयार्ड असेही म्हटले जाते. विमानांची अशी ग्रेव्हयार्ड जगभरात आहेत. पण अमेरिकेत ती जास्त प्रमाणात आहेत.

या डेपो किंवा ग्रेव्हयार्ड मध्ये शेकडो विमानांना आश्रय दिला जातो. अमेरिकेच्या दक्षिण, पूर्व भागात आणि वाळवंटी प्रदेशात अशी ग्रेव्हयार्ड्स आहेत. येथे आणून सोडलेली विमाने प्रथम रसायन वापरून स्वच्छ धुतली जातात आणि त्यांना गंज लागू नये अशी व्यवस्था केली जाते. नंतर विमानाची इंजिन इंधन काढून घेऊन रिकामी केली जातात. नंतर एक एक सुटा भाग मोकळा केला जातो. विमानात असे ३.५ लाख सुटे भाग असतात. त्यातील जे चांगले असतील ते बाजूला काढून विमान रिपेरिंग साठी त्यांचा वापर होतो.

सर्व भाग मोकळे केले कि विमानाचा सांगाडा उरतो. क्रेनच्या सहाय्याने तो क्रश करून वितळण्यात येतो आणि रिसायकल करून पुन्हा वापरला जातो. काही कंपन्या हे सांगाडे अन्य कारणांसाठी वापरतात. उदाहरण द्यायचे तर स्वीडनमध्ये अश्या विमानांचे सांगाडे वापरून २५ खोल्याचे हॉटेल बनविले गेले आहे. मेक्सिको मध्ये असे २०० सांगाडे वापरून त्यातून विशालकाय लायब्ररी बनविली गेली आहे. ‘गिलेस्को’ नावाच्या या लायब्ररीसाठी बोईंग ७२७ व ७३७ विमानांचा वापर केला गेला आहे. येथे हजारो पुस्तके आहेतच पण त्याचबरोबर लॉबीज, दोन मिटिंग रूम्स, ऑडीटोरीयम आणि अनेक प्रकारच्या सुंदर खोल्या बनविल्या गेल्या आहेत.