पेगासस विवाद- इस्त्रायलने सायबर तंत्र निर्यात यादीतून ६५ देशांची नावे वगळली

इस्रायलच्या सायबर तंत्रज्ञान क्षेत्रातील एनएसओ कंपनीच्या पेगासस हॅकिंग टूल वरून निर्माण झालेल्या विवादानंतर इस्रायलने त्यांच्या सायबर तंत्रज्ञान निर्यात धोरणात बदल केला आहे. इस्रायलच्या सायबर तंत्रज्ञान खरेदीस अनुमती असलेल्या देशांच्या यादीत इस्रायलने कपात केली असून ही यादी १०२ देशांवरून ३७ देशांवर आणली आहे. वगळण्यात आलेल्या देशात भारताचा समावेश नाही. मेक्सिको, मोरक्को, सौदी अरेबिया, युएई यांच्यावर तंत्रज्ञान खरेदीसाठी इस्रायलने बंदी घातली आहे. या संदर्भात इस्रायल रक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या देशांनी निर्यात परवाना वापर अटींचे उल्लंघन केल्याने हे पाउल उचलले गेले आहे.

इस्रायलच्या एनएसओ विरुद्ध अॅपल समेत अन्य बड्या टेक कंपन्यांनी दावा दाखल केला असून एनएसओवर ग्राहकांचा डेटा जोखीमीत घातल्याचा आरोप ठेवला आहे. रॉयटर्सच्या बातमीनुसार इस्रायलने त्यांचे सायबर तंत्रज्ञान आयात करणाऱ्या देशांची संख्या कमी केली आहे. जुलै मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय मिडियामध्ये पेगासस टूल बद्दल बातम्या आल्या होत्या आणि त्यात पत्रकार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगासस हॅकिंग टूलच्या सहाय्याने हॅक केले जात असल्याचे आरोप केले होते. त्यामुळे जगभरातून या टूल नियंत्रणासंबंधी इस्रायलवर दबाव टाकला जात होता. अर्थात एनएसओने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि त्यांनी हे टूल फक्त सरकारे आणि कायदा क्षेत्रात काम करण्याऱ्या कंपन्यांना दिल्याचे स्पष्ट केले होते.