आता अलिगढ मध्ये बनताहेत डिजिटल कुलपे
जगभरात पारंपारिक पद्धतीची, मजबूत आणि सुरक्षेत बेजोड कुलुपे बनणारे ठिकाण म्हणून उत्तरप्रदेशातील अलिगढ प्रसिद्ध आहे. मात्र आता जगाची बदललेली आवड आणि बायोमेट्रिक कुलपांची वाढती मागणी लक्षात घेऊन अलिगढ मध्येही नेक्स जनरेशन लॉक्स बनविली जात आहेत. बोटाच्या स्पर्शाने उघडणारी ही कुलुपे बनविण्यासाठी तैवानचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. तैवानचे तंत्रज्ञान आणि अलीगडची मजबुती असा संगम या कुलुपात पाहायला मिळेल. सध्या डिजिटल लॉक्सवर चीनचे वर्चस्व आहे.
या कुलुपात फिंगरप्रिंट स्कॅन करून डेटा स्टोर केला जातो. त्यात टच पॅनल असते. स्क्रीनवर बोट ठेवले कि सेन्सरच्या सहाय्याने स्कॅनिंग होते व ठसा जुळला कि कुलूप उघडते. या कुलुपात स्मार्टकार्ड व बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन कंट्रोल सुद्धा देता येतो. त्यामुळे स्मार्टफोनच्या सहाय्याने कुलूप कंट्रोल होते व वायफाय कनेक्ट केले कि दूर अंतरावरून सुद्धा ऑपरेट करता येते. सुरक्षेसाठी त्यात सायरन व अॅलर्ट सिस्टीम दिली जाते. युएसबी चार्जरच्या सहाय्याने कुलूप चार्ज करता येते आणि एका चार्ज मध्ये ते सहा महिने काम करू शकते.
कोविड १९ साथ काळात डिजिटल लॉक बाजार जगभरात वेगाने वाढला आहे. २०२० मध्ये तो ३ अब्ज डॉलर्स वर होता आणि २०२७ पर्यंत तो १७.९ अब्ज डॉलर्सवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.