शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीत दाखल


नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलदेखील दिल्लीत दाखल झाले आहेत. मुंबईतील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करुन शरद पवार दिल्लीला गेल्याचे समजत आहे. दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील दिल्लीत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची दिल्ली दौऱ्यात शरद पवार भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण कोणतीही अधिकृत माहिती याबाबत देण्यात आलेली नाही. विरोधकांची बैठक असून त्यात सहभागी होण्यासाठी शरद पवार गेल्याचेही सांगितले जात आहे. पण नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

दुसरीकडे दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची खलबते सुरु आहेत. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या दोन्ही नेते भेटी घेणार आहेत. त्यांनी भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.