चांदीवाल आयोगासमोर परमबीर सिंह हजर राहण्याची शक्यता


मुंबई – आज ठाण्यातील नगर पोलीस ठाण्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह दाखल झाले. परमबीर सिंह 234 दिवसांनंतर काल (गुरुवारी) मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर कांदिवलीत गुन्हे शाखेच्या कार्यालयात त्यांची सात तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर ते आज ठाण्यात दाखल झाले आहेत. परमबीर आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांवर धमकी देऊन साडे तीन कोटींची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी होणार आहे.

परमबीर सिंहांविरोधात जो गुन्हा ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. त्यात दिलेल्या वेळेत आरोप पत्रच पोलिसांनी दाखल केले नाही. पोलीस अधिकारी गुन्ह्याबाबत कागदपत्रे देखील विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना उपलब्ध करून देत नाहीत म्हणून तक्रार दाखल केली होती. म्हणून ठाणे न्यायालयाने 29 आरोपींपैकी एक असलेल्या आणि दाऊदचा साथीदार तारिक परवीन याला परवा जामीन मंजूर केला होता. यात पोलीसच परमबीर सिंह यांना वाचवत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला होता. पण असे असले तरी, परमबीर सिंहांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून 6 डिसेंबरपर्यंत दिलासा दिला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपपत्रच दाखल केलेले नसल्याचे सांगत ते न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल करु शकतात.

न्यायालयाने फरार घोषित केलेले परमबीर सिंह काल मुंबई पोलिसांपुढे हजर झाले होते. त्यांच्यावर असलेल्या वेगवेगळ्या आरोपांवर गुन्हे शाखेने त्यांची तब्बल सात तास चौकशी केली आहे. गुन्हे शाखेची ही चौकशी पूर्ण झाली असून परमबीर सिंहांनी त्यांच्यावर असलेले सर्व आरोप फेटाळल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना मी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तपासाला सहकार्य करेन. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे असून न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे आणि सत्याचा विजय होईल असे परमबीर सिंहांनी यांनी म्हटले आहे. गुन्हे शाखेने परमबीर सिंह यांची चौकशी केली, असली तरी त्यांच्यावर इतरही काही आरोप ठेवण्यात आल्यामुळे त्या प्रकरणांमध्येही परमबीरांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.