न्यासा कंपनीच घेणार आरोग्य विभागाच्या ‘त्या’ उमेदवारांच्या परीक्षा


मुंबई – मागील काही दिवसांपूर्वीच आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत ढिसाळ नियोजन आणि चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्याच्या मुद्यावरून गदारोळ झाला होता. ही परीक्षा घेणाऱ्या ‘न्यासा’ कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आता, न्यासा कंपनीच चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळालेल्या आरोग्य विभागाच्या उमेदवारांच्या परीक्षा घेणार आहे. 589 विद्यार्थ्यांची 11 संवर्गाची परीक्षा 28 नोव्हेंबरला नाशिक पुणे लातूर अकोला या जिल्ह्यांमध्ये घेतली जाणार आहे.

गट ‘क’ साठी मागील महिन्यात, 24 ऑक्टोबरला घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांना दुसऱ्या पदाच्या (संवर्गाच्या) प्रश्नपत्रिका न मिळाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. तर काही उमेदवारांना या परिक्षेदरम्यान चुकीच्या प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्याचेही निर्दशनास आले होते. घडलेल्या या प्रकारानंतर ‘न्यासा कम्युनिकेशन’ यांनी उमेदवारांनी दिलेला परिक्षेचा संवर्ग आणि प्रश्‍नपत्रिका क्रमांकानुसार चुकीची प्रश्‍नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी सादर करण्याचे आवाहन केले होते.

त्यानुसार आता ही यादी प्राप्त झाली असून अशा उमेदवारांची परीक्षा परत घेण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती, त्याच उमेदवारांची पुन्हा परीक्षा होणार आहे. एकूण 589 उमेदवारांची होणार गट ‘क’ ची परीक्षा पुन्हा होणार आहे.

त्यानुसार या विद्यार्थ्यांची शंभर गुणांची परीक्षा आता न घेता 40 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. 50 मिनिटांचा वेळ या परीक्षेसाठी असणार आहे. इतर 60 प्रश्न हे सर्व संवर्गासाठी सारखे असल्यामुळे फक्त 40 गुणांची परीक्षा होणार आहे. चुकीची प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना मिळाली होती व ज्यांची परीक्षा पुन्हा एकदा घेतली जाणार अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) सुद्धा न्यासा कंपनीने पाठवण्यास सुरुवात केली आहे.