आता तुम्ही देखील बनवू शकता WhatsApp Web च्या मदतीने स्वत:चे स्टीकर


सध्याच्या घडीला सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत आणि जगात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेज अॅप म्हणजे व्हॉट्सअॅपमध्ये सातत्याने नवनवे बदल होत असतात. आता तुम्ही एका नवीन बदलाच्या मदतीने स्वत:चा अॅनिमेटेड अवतार अर्थात स्टीकर बनवू शकणार आहात. व्हॉट्सअॅप वेब यूजर्स सध्यातरी या फिचरचा वापर करु शकतात. तर नेमके हे फिचर कसे वापरता येईल आणि तुम्ही तुमचे स्टीकर कसे बनवू शकता याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

व्हॉट्सअॅप वेबवर सध्या वापरता येणारे हे फिचर लवकरच मोबाईलसाठी देखील लॉन्च करण्यात येणार आहे. हे फिचर सध्याच्या काळात बीटा वर्जनच्या मदतीने काही मोबाईलवर वापरता येत असले तरी लवकरच सर्व मोबाईल युजर्ससाठी हे फिचर उपलब्ध होणार आहे. तर मोबाईलवर ही सुविधा येण्याआधी तुम्ही सध्या व्हॉट्सअॅप वेब वापरत असाल तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही स्वत:चे स्टीकर बनवू शकता. जर तुम्ही हे फिचर डेस्कटॉपवर वापरु इच्छित असाल, तर तुम्हाला स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

जाणून घेऊया काय आहेत त्या स्टेप्स

  • सर्वात आधी डेस्कटॉप अर्थात कंप्यूटरवर व्हॉट्सअॅप वेब ओपन करा.
  • आता कोणालाही मेसेज करताना किबोर्डजवळ एक पेपर क्लिप आयकॉन तुम्हाला दिसेल.
  • या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टीकरचा दुसरा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • स्टिकर आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोटो सिलेक्ट करण्याचा ऑप्शन दिसेल.
  • त्यानंतर हवा तो फोटो सिलेक्ट करताच तुमच्या समोर एक कस्टमाइजेशन टूल दिसेल.
  • तुम्ही या टूलच्या मदतीने हवा तसा अवतार धारण करुन स्वत:च्या फोटोचे स्टीकर तयार करु शकाल आणि सेव्ह करुन हवे त्याला पाठवू शकाल.