राज कुंद्राची अटकपूर्व जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली


मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणी २०२० मधील पॉर्न व्हिडीओ प्रकरणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. राज कुंद्राची अटकपूर्व जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. एकूण सहा जणांची याचिका फेटाळण्यात आली असून राज कुंद्रासोबत शर्लीन चोप्रा आणि पूनम पांडेचाही यामध्ये सहभाग आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी यावेळी आरोपांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला आहे.

ज्यांची याचिका फेटाळली गेली आहे त्यामध्ये इतर तिघे सुवोजित चौधऱी, उमेश कामत आणि सॅम अहमद यांचा समावेश आहे. ६ नोव्हेंबर २०२० ला मुंबई सायबर पोलिसांनी २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. ६७ वर्षीय निवृत्त कस्टम आणि केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकारी मधुकर केनी यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३१ ऑक्टोबर २०२१ ला आक्षेपार्ह सामग्री असणाऱ्या प्लॅटफॉर्मबद्दल मधुकर केनी यांनी तक्रार केली होती. सर्च इंजिनमध्ये शर्लीन चोप्रा नाव टाकण्यात आले असता स्क्रीनवर आक्षेपार्ह व्हिडीओ येत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.

यावेळी आपण एक व्यवसायिक महिला तसेच कलाकार असून भारतीय मार्केटमध्ये चित्रपट, शॉर्ट फिल्म्स तसेच वेब सीरिजची आणि आंतरराष्ट्रीय मार्केटसाठी अॅडल्ड कंटेंटची निर्मिती करत असल्याचे शर्लिन चोप्राने म्हटले. आपण फक्त अधिकृतपणे नोंद असलेल्या वेबसाईट्ससाठी काम करत असताना एफआयआरमध्ये नोंद असलेल्या पॉर्न साईट्स या कॉपीराईट्सचे उल्लंघन करणाऱ्या बनावट साईट्स असल्याचा दावा तिने केला आहे. दरम्यान गेल्यावर्षी एफआयआरमध्ये आपले नाव नव्हते आणि आपण तपासात सहकार्य केले असल्याचे राज कुंद्राने सांगितले. तसेच आपला यात सहभाग नसल्याचाही दावा केला आहे.