एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील नेत्यांवर जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप


मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे. ७०,००० एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३५० रुपये घेतल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. तसेच यातून कर्मचाऱ्यांची लूट करण्यात आली असून एसटी संप कर्मचारी उपाशी आणि नेते तुपाशी असे म्हणत निशाणा साधला आहे.


जितेंद्र आव्हाड या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ३५० रुपये घेण्यात आले. एकूण ७०,००० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांची लूट करण्यात आली. ST संप कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी, असे म्हटले आहे.

दरम्यान, याआधी एसटी कामगारांच्या संपात सहभागी झालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला होता. कामगार समजुतीने घेत आहेत, पण एक विशिष्ट वर्ग या राज्यातील, देशातील वरिष्ठ आणि सन्माननीय नेत्यांविषयी एकेरी भाषेत उल्लेख करत होते. यांची लायकी काय आहे? हे कोण लागून गेले?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता.

संजय राऊत असे देखील म्हणाले होते, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्याआधी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संपातून तोडगा काढण्यासाठी कामगारांना चांगली आर्थिक मदत मिळावी म्हणून पॅकेज जाहीर केले. परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार कमीतकमी ५,००० रुपये पगारवाढ करणार आहेत. त्यामुळे कामगारांचा पगार २४,००० रुपयांपर्यंत जाणार आहे. याची तरतूद राज्य सरकार करणार आहे, तरीही कामगारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ देणारे काही राजकीय विरोधी पक्ष हा संप चिघळवत ठेवणार असतील तर ते हजारो कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे नुकसान करत आहेत.

एसटी कामगारांचा त्यांना गिरणी कामगार करायचा आहे का? राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे लोक कामगारांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहोत. मुंबई ही कामगार-शेतकऱ्यांच्या लढ्यातून आम्हाला मिळाली आहे. कष्टकऱ्यांचे नुकसान व्हावे, असा विचार आमचे सरकार कधीही करणार नाही. राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण त्यांना आर्थिक मदत देत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते.