अवघ्या दोन तासात सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला, 6 लाख कोटींचे नुकसान


मुंबई – शेअर बाजार आज सकाळी घसरणीसह सुरू झाला. मोठ्या प्रमाणावर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. सेन्सेक्स 1300 अंकानी घसरला. तर, निफ्टीदेखील 350 अंकांनी घसरला. शेअर बाजारावर कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळल्याच्या वृत्ताचा परिणाम झाल्याचे म्हटले जात आहे. मार्च 2020 सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होईल, अशी भीती गुंतवणुकदारांमध्ये निर्माण झाल्यामुळे बाजारात घसरण सुरू असल्याचे म्हटले जात आहे. शेअर बाजार सकाळच्या घसरणीनंतर पुन्हा सावरत असल्याचे दिसून आले. सकाळी दोन तास झालेल्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे सहा लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे.

सेन्सेक्समध्ये आज सकाळी 541 अंकांनी घसरण होऊन 58,254.79 अंकांवर सेन्सेक्स सुरू झाला. त्यानंतरही घसरण वाढत चालली आहे. त्यानंतर सेन्सेक्स 1109 अंकांनी घसरला. त्यानंतर सेन्सेक्सने 57,727.520 अंकावर गेला होता. तर, दुसरीकडे निफ्टीमध्येही घसरण दिसून आली. गुरुवारी 17,536.25 स्तरावर बंद झाला होता. आज शुक्रवारी, निफ्टी 198 घसरणीसह 17,338.75 अंकावर सुरू झाला. त्यानंतर निफ्टीत घसरण होऊन 17,177.05 अंकापर्यंत कोसळला. निफ्टीमध्ये जवळपास 359 अंकाची घसरण दिसून आली.

या आठवड्याच्या सुरुवातीलाही सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली होती. त्यानंतरच्या व्यवहाराच्या दिवसांमध्ये बाजार सावरू लागला होता. मात्र, आठवड्याच्या शेवटी बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या 30 कंपन्यापैकी फक्त डॉ. रेड्डीज लॅबच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली होती. त्याशिवाय इतर 29 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. निफ्टीमधील पहिल्या 50 पैकी फक्त 3 शेअरचा दर वधारलेला दिसून आला. हे तिन्ही शेअर फार्मा क्षेत्रातील आहेत. तर, इतर 47 शेअरमध्ये घसरण दिसून आली.