सोमय्यांनी केलेल्या आरोपांनंतर ईडीचा शिवसेना नेते अर्जुन खोतकरांच्या जालन्यातील घरावर छापा


जालना – अंमलबजावणी संचालनायलयाने (ईडी) आज सकाळी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या यांच्या जालन्यामधील निवासस्थानी छापा टाकला आहे. लना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी ही छापेमारी करण्यात आली आहे.

आज सकाळी साडेआठ वाजता जालन्यामध्ये शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या घरी ईडीचा छापा पडला. खोतकर हे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळेच जालन्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतही ईडीकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. ईडीचे पथक सकाळी साडेआठ वाजल्यापासून खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यामध्ये आहे. १२ जणांचे पथक या ठिकाणी तपासणी करत आहे. आतमधून दरवाजे बंद केले असून कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही.

अर्जुन खोतकर हे छापा पडला तेव्हा घरीच असल्याची माहिती समोर आली आहे. सोमय्यांनी औरंगाबादमधील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यामध्ये अर्थिक संबंध असल्याची तक्रार केली होती. यापूर्वी खोतकरांनी हे आरोप फेटाळून लावले होते. कारखान्यात आपले काही लाखांचे शेअर्स आहेत. आपण भागीदार आहोत. मालक नसल्याचे खोतकर यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. जालन्यातील रामनगर साखर कारखान्यांच्या व्यहारांमध्ये, औरंगाबादमधील ज्या व्यवसायिकांवर छापेमारी झाली, त्या उद्योजकांशी खोतकरांचे अर्थिक संबंध असल्याचा आरोप केला होता.