लोकशाही मूल्यांच्या विरोधात राजकीय पक्षातील घराणेशाही; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल


नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय पक्षातील घराणेशाही लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे वक्तव्य केले आहे. पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याच्या हातात एका पक्षाची सूत्रे राहणे लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकशाही मूल्य ज्यांनी गमावली आहे, ते लोकशाहीचे संरक्षण कसे करु शकतील? असा सवाल करत मोदींनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणाही साधला. संसदेत संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, एका अशा संकटाकडे भारत जात आहे, जो संविधानाशी समर्पित असलेल्या लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. आपल्या चांगल्या गुणांच्या आधारे एका परिवारातून अनेक लोक राजकारणात येत असतील, तर ती घराणेशाही नसल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी संविधान दिवस समारंभात म्हटले की, आजचा दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या पवित्र जागेवर काही लोकांनी भारताच्या कुशल भविष्यासाठी मंथन केले होते. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आजच्या दिवशी 2008 साली मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामुळे देश हादरुन गेला होता. आपल्या सैन्याने दहशतवाद्यांशी निकराचा लढा दिला होता. यात जवानांसह काही नागरिकांनी बलिदान दिले होते. या सर्व वीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे.