काल दिवसभरात देशात 24 तासांत 10,549 कोरोनाबाधितांची नोंद, 488 बाधितांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी घट झाली असली, तरी धोका अद्याप टळलेला नाही. काल दिवसभरात देशात 10,549 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली, 488 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीनंतर कोरोनाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,45,55,431 वर पोहोचली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,10,133 असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे. तर काल दिवसभरात 9,868 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण 3,39,77,830 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत कोरोनामुळे 4,67,468 बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे जिथे कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण होत आहे. तर दुसरीकडे देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. काल दिवसभरात देशातील 83,88,824 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत देशात एकूण 1,20,27,03,659 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा एका नवा व्हेरिएंट आढळल्यामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट संदर्भात नवीन माहिती देताना दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत मल्टिपल म्युटेशन क्षमता असलेला कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ झाल्यानंतर या नव्या व्हेरिएंटची माहिती समोर आली आहे. वायरोलॉजिस्ट ट्यूलिओ जी ओलिवेरा यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती आली आहे. दुर्दैवाने आम्हाला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. जो दक्षिण आफ्रिकेतील वाढत्या कोरोना संक्रमणाचे कारण आहे.

तर काल दिवसभरात राज्यात 848 नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर, 50 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याशिवाय, 987 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 64 लाख 79 हजार 396 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.68 टक्क्यांवर पोहचला आहे. राज्यात सध्या 9 हजार 187 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्र सरकारला राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात मोठे यश आले आहे. राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. आतापर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या सहा कोटी 50 लाख 47 हजार 491 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 66 लाख 33 हजार 105 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या राज्यात 90 हजार 538 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 1 हजार 65 रुग्ण वैद्यकीय संस्थेत उपचार घेत आहेत.