दिलीप वळसे पाटील यांचे परमबीर सिंह यांच्यावर कारवाईचे संकेत!


मुंबई – जवळपास २८० दिवसांनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे अखेर मुंबईत हजर झाले. परमबीर सिंह खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी गुरुवारी कांदिवलीतील क्राईम ब्रांच युनिटसमोर हजर झाले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. परमबीर सिंह हे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचे आरोप केल्यानंतर गायब झाले होते. न्यायालयाकडून आणि ईडीकडून देखील चौकशीचे समन्स दिल्यानंतर ते हजर झाले नसल्यामुळे त्यावरून बरीच चर्चा सुरू होती. ते आता अखेर हजर झाले असून आता त्यांच्यावर काय कारवाई होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सूतोवाच दिले आहेत.

परमबीर सिंह यांनी केलेल्या गैरव्यवहारांसाठी त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल? अशी विचारणा माध्यम प्रतिनिधींनी दिलीप वळसे पाटील यांना केली असता पाटील यांनी त्याबाबत माहिती दिली. परमबीर सिंह यांच्यावर पोलीस सेवा नियमावलीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल. यासंदर्भात पुढील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांच्याशी बोलल्यानंतरच घेतला जाईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि सध्या फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह काल मुंबईत दाखल झाले. परमबीर सिंह हे मागील काही महिन्यांपासून तपास यंत्रणांसमोर येण्यासाठी टाळाटाळ करत होते. फौजदारी गुन्हे दाखल असल्यामुळे अटकेच्या भीतीने गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते समोर आल्याचे सांगितले जात आहे.