आनंद महिंद्रांची सटकली; जर कोरोना एखादी व्यक्ती असती, तर त्याला बॉक्सिंग रिंगमध्ये घेऊन झोडपून काढले असते!


आपल्या हटके ट्विट्समुळे उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा कायम चर्चेत असतात. आनंद महिंद्रा राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच विषययांवर करत असलेले ट्विट व्हायरल होत असतात. आता कोरोनासंदर्भात आनंद महिंद्रांनी केलेले एक ट्विट व्हायरल होत असून नेटिझन्स देखील त्यावर प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. जगभरातील नागरिकांसमोर गेल्या दोन वर्षांपासून मोठा धोका म्हणून उभा राहिलेला कोरोना अद्याप काही केल्या जायचे नाव घेत नसून त्याचे नवनवे व्हेरिएंट समोर येत आहेत. त्यामुळे सातत्याने आरोग्य यंत्रणेसमोर आव्हाने उभी राहात आहेत. असाच एक नवीन व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत सापडला असून त्यावरच आनंद महिंद्रांनी ट्विट केले आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा एका नवा व्हेरिएंट आढळल्यामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेत मल्टिपल म्युटेशन क्षमता असलेला हा नवा व्हेरिएंट आढळला आहे.कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर या नव्या व्हेरिएंटची माहिती समोर आली आहे. हा व्हेरिएंट B.1.1.1529 या नावाने ओळखला जातो. या व्हायरसचे बोटस्वानामध्ये ३, दक्षिण आफ्रिकेत ६ तर हाँगकाँगमध्ये १ बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारही सावध झाले असून आरोग्य मंत्रालयाने बोटस्वाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमधून येणाऱ्या प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


आनंद महिंद्रांनी याच व्हेरिएंटबाबत वैतागून ट्विट केले आहे. या कोरोनाचा आता मला कंटाळा आला आहे रे… मला तर असे वाटते की जर करोना एखादी त्रास देणारी व्यक्ती असती, तर त्याला मी थेट बॉक्सिंग रिंगमध्ये घेऊन झोडपून काढले असते, असे या ट्विटमध्ये महिंद्रांनी म्हटले आहे. त्यांनी या ट्विटसोबत दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या व्हेरिएंटबाबतचे वृत्त शेअर केले आहे.