सात तास चौकशीनंतर आज पुन्हा परमवीर सिंग यांची चौकशी

सात महिने गायब राहिल्याने फरारी घोषित झालेले मुंबईचे माजी पोलीस कमिशनर परमवीरसिंग बुधवारी मुंबईत दाखल झाले असून गुरुवारी त्यांची गोरेगाव वसुली प्रकरणात कांदिवली पोलीस गुन्हा शाखेने ७ तास चौकशी केली. आज म्हणजे शुक्रवारी परमवीर यांना पुढील चौकशीसाठी पुन्हा बोलावले गेले असल्याचे समजते. गुरुवारी चौकशीनंतर प्रथमच पत्रकारांना सामोरे गेलेल्या परमवीर सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशानुसार तपासात मदत करण्यासाठी आल्याचे सांगितले आणि न्यायालयाचा आदर करतो असे बोलून अन्य कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.

मात्र परमवीरसिंग यांच्या वकिलाने दिलेल्या माहितीनुसार परमवीर यांनी या चौकशीत त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले असल्याचे समजते. विमल अगरवाल या व्यावसायिकाने सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांनी त्याच्याकडून कोट्यावधी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप करून तशी तक्रार पोलिसात केली होती त्यासंदर्भात परमसिंग यांची चौकशी झाली. मात्र त्यांनी सचिन वाझे याने त्यांचे नाव वापरून कुणाकडून किती खंडणी गोळा केली याची काहीही माहिती आपल्याला नाही असे चौकशीत सांगितले आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही असे म्हटले आहे.

परमवीर सिंग यांच्यावर मुंबई पोलिसांनी अँटीलिया केस मधील मनसुख हिरेन यांची हत्या, अनिल देशमुख यांनी दिलेले वसुली टार्गेट अश्या विविध संदर्भात पाच केसेस दाखल केल्या गेल्या आहेत. पैकी अनिल देशमुख त्यांच्या विरोधात परमवीर सिंग यांनी अगोदरच एक पत्र न्यायालयात सादर केले होते. परमवीर यांची मुंबई कमिशनर पदावरून उचलबांगडी केली गेल्यावर त्यांच्या विरोधात तक्रारींचा पाउस पडला होता. मात्र दरम्यान परमसिंग मुंबईतून गायब झाले आणि वारंवार समन्स पाठवूनही हजर झाले नाहीत तेव्हा यांना मुंबई उच्च न्यायालाने फरारी घोषित करून ३० दिवसात हजर न झाल्यास त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले होते.

त्यानंतर परमवीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन मुंबई पोलिसांकडून जीवाला धोका असल्याने अटक केली जाऊ नये अशी विनंती केली त्याला न्यायालयाने मंजुरी दिल्यावर परमवीर मुंबईत दाखल झाले आहेत.