येथे बनतेय समुद्रात तरंगणारे स्वप्नातले शहर

अभियांत्रिकी प्रगतीने जगाचे रुपडे बदलून टाकले असून या प्रगतीमुळे केवळ स्वप्नातील वाटाव्यात अश्या अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत. येत्या तीन वर्षात जगात प्रथमच समुद्रावर तरंगणारे एक अद्भुत शहर तयार होत आहे. दक्षिण कोरियातील बुसान कोस्टवर तयार होत असलेल्या या शहराला युएनने हिरवा कंदील दाखविला आहे. डेली मेलच्या रिपोर्ट नुसार न्यूयॉर्क डिझायनर ओशिअॅनिक्स कंपनी, युएन हॅबीटेट व बुसान मेट्रो सिटी एकत्र येऊन या शहराची उभारणी करत आहेत. या शहराला पुराचा फटका बसणार नाहीच पण पाच कॅटेगरीची वादळे सुद्धा या शहराला काहीही नुकसान पोहोचवू शकणार नाहीत.

जगातले पहिले तरंगते असे हे शहर २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे. हे शहर फ्लड प्रुफ आहे त्यामुळे समुद्र पातळी वाढली तरी त्याचा धोका राहणार नाही. येथे समुद्रात काही कृत्रिम बेटे तयार केली जात आहेत. वीज निर्मिती सोलर पॅनल मधून होणार आहे. गरजेपुरते खाद्य येथेच पिकविले जाणार असून येथे राहण्याऱ्या लोकांना वनस्पतीजन्य पदार्थच खावे लागतील. पिण्यासाठी ताजे पाणी असेल. दोन बेटांच्या दरम्यान ये जा करण्यासाठी बोट पॉडसचा वापर केला जाणार आहे.

२०० दशलक्ष डॉलर्स खर्चून वसविल्या जात असलेल्या या शहरात षटकोनी बेटे तयार केली गेली आहेत आणि सात मजली इमारती बांधल्या जात आहेत. बेटांना कॉक्रीट पेक्षा तिप्पट मजबूत अश्या लाईमस्टोनचे कोटिंग केले जात आहे. प्रत्येक प्लांट खाली पिंजरा असून तेथे झाडांपासून खत तयार होणार आहे. ७५ हेक्टर परिसरात बांधल्या जात असलेल्या या शहरात १० हजार लोक राहू शकणार आहेत.